
सामना ऑनलाईन, मुंबई
कांगारूंच्या देशात क्रिकेटमधील 71 वर्षांच्या कारकीर्दीत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या ‘टीम इंडिया’वर क्रिकेटविश्वातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात चारीमुंडय़ा चीत केल्याने जाम खूश झालेल्या गर्भश्रीमंत हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघातील प्रत्येक खेळाडूंला मालामाल करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.
विराट कोहलीच्या हिंदुस्थानने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केल्यामुळे ‘बीसीसीआय’कडून संघातील मुख्य खेळाडूंना कसोटीमागे 15 लाख रुपयांचा बोनस मिळणार आहे. याचसोबत चारही कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना 60 लाखांचा बोनस जाहीर केला आहे. याकेळी बीसीसीआयने राखीव खेळाडूंनाही खूश केले असून त्यांनाही साडेसात लाखांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे.
खेळाडूंसोबतच संघाचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांनाही ‘बीसीसीआय’ने बक्षीस जाहीर केले आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांना 25 लाख, तर सपोर्ट स्टाफला त्यांच्या मानधनाइतकी रक्कम बोनस म्हणून जाहीर करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा हिंदुस्थान हा पहिला आशियाई संघ ठरला आहे.

























































