
आधी वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहलीची माघार, मग केएल राहुल आणि रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर गेले होते. आता त्यात मधल्या फळीतील श्रेयस अय्यरचेही नाव जोडले गेले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेविरुद्ध हिंदुस्थानी संघाला लागलेल्या दुखापतीच्या ग्रहणामुळे संघाची मधली फळी अक्षरशः खिळखिळी झाली आहे. श्रेयसला झालेल्या दुखापतीमुळे तो कसोटी मालिकेतील उर्वरीत तीन कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता असल्याने त्याचा पर्याय शोधण्याचे खडतर आव्हान टीम इंडियापुढे उभे ठाकले आहे.
हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ पूर्ण ताकदीने आपला खेळ करत आहेत. पहिला कसोटी सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱया कसोटी सामन्यात यशस्वी जैसवाल आणि जसप्रीत बुमराह यांच्या खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा राजकोट येथे 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, तिसऱया कसोटी सामन्यापूर्वीच श्रेयसला दुखापत झाल्याने हिंदुस्थानला धक्का बसला आहे. श्रेयसला पाठीची दुखापत झाली असून त्याच्या मांडीचे स्नायूदेखील दुखत आहेत. त्यामुळे तो इंग्लडविरुद्धच्या पुढील तिन्ही कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुल, रवींद्र जाडेजा आणि मोहमद शमी यांना दुखापत झाल्याने ते संघाबाहेर आहेत. या धक्क्यातून टीम इंडिया सावरत असतानाच श्रेयसच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. केएल राहुल आणि जाडेजा तिसऱया कसोटीत परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप दोघांच्या पुनरागमनाचे चित्र स्पष्ट झालेले नाही.
श्रेयसची जागा कोण घेणार?
श्रेयस राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीबाबत चाचण्या करणार आहे, तर दुसरीकडे विराट तिसऱया कसोटीसाठी उपलब्ध आहे का नाही याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसल्याने संघ निवड लांबणीवर पडली आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत श्रेयस फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. मात्र, जर श्रेयस दुखापतीमुळे तिन्ही कसोटी सामन्यांतून बाहेर पडला तर त्याच्या जागी मधल्या फळीत फलंदाज शोधणे टीम इंडियासाठी आव्हान असणार आहे. श्रेयसच्या जागी हनुमा विहारी, मयांक अगरवाल, रजत पाटीदार, सरफराझ खान यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.




























































