सहा कोरोना टेस्ट अन् 14 दिवस क्वारंटाईन, श्रीलंका दौऱयापूर्वी ‘टीम इंडिया’चे वेळापत्रक

शिखर धवनच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी क्रिकेट संघ मुंबईत 14 ते 28 जूनदरम्यान क्वारंटाईन राहणार आहे. श्रीलंका दौऱयावर रवाना होण्यापूर्वी हिंदुस्थानी क्रिकेटपटूंच्या दिवसाआड सहा कोरोना टेस्ट (आरटीपीसीआर) होणार आहेत. ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी ही माहिती दिली.

श्रीलंका दौऱयावर जाणाऱया ‘टीम इंडिया’साठीही इंग्लंड दौऱयावर गेलेल्या हिंदुस्थानच्या वरिष्ठ संघासारखेच इतर कोरोना नियम आहेत. विविध राज्यांतील क्रिकेटपटू चार्टर्ड प्लेनने येणार असून काही कमर्शियल एअरलाईनच्या बिझनेस क्लासने प्रवास करतील. मुंबईत दाखल झालेले सर्व खेळाडू सात दिवस आपापल्या रूममध्ये क्वारंटाईन राहतील. त्यानंतर ‘टीम इंडिया’च्या बायो-बबलमध्ये एकत्रित प्रवेश करतील. खेळाडू वेगवेगळ्या सत्रात जिममध्येदेखील सराव करणार आहेत.

हिंदुस्थान-श्रीलंका दरम्यान 13 जुलैपासून तीन वन डे सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. हिंदुस्थान-श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिकाही होणार आहे. कोलंबोत गेल्यावर हिंदुस्थानी खेळाडूंना तीन दिवस हॉटेलमध्येच आपापल्या रूममध्ये राहावे लागणार आहे.

द्रविड अॅण्ड कंपनी करणार मार्गदर्शन

शिखर धवनच्या नेतृत्वात हिंदुस्थानी संघ श्रीलंकेशी श्रीलंकेत दोन हात करणार आहे. या मालिकेत राहुल द्रविड टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. टी दिलीप यांच्याकडे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक पदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. तसेच पारस म्हाब्रे हे गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहेत, अशी माहिती मीडियामधून समोर आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या