कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या टीम इंडियाला दिलासा; संघ सरावासाठी पुन्हा मैदानात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी कसून सराव केला

कोरोना संसर्गाच्या तडाख्यात सापडलेल्या टीम इंडियाला पहिल्या एकदिवसीय सामन्याला दोन दिवस शिल्लक असताना दिलासा मिळाला आहे. शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांच्या व्यतिरिक्त अन्य क्रिकेटपटूंचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने संघ व्यवस्थापनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी गुरुवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर सरावालाही सुरुवात केली आहे.

एकदिवसीय सामन्यात संघाने नव्याने स्थान मिळालेल्या मयांक अगरवालला तीन दिवस विलगीकरणात राहावे लागत असल्याने संघातील निवडीसाठी पहिल्या लढतीच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाने संघावरील कोरोना हल्ल्यानंतर एकदिवसीय संघात यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन यालाही स्थान दिले आहे. संघाला येत्या 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तीन एकदिवसीय लढतीची मालिका खेळायची आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या धक्क्यातून सावरलेल्या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी शुक्रवारी आपल्या ट्रेनर्ससह मैदानात सरावाला उतरणे पसंत केले.या सरावात ईशान किशनही सहभागी झाला होता. ईशान यष्टीरक्षक असून धडाकेबाज सलामीचा फलंदाजही असल्याने त्याचा संघात समावेश केल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

अहमदाबादमधील वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली वन डे लढत टीम इंडियासाठी 1 हजारावी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय लढत असेल. या ऐतिहासिक लढतीपूर्वीच संघ कोरोनाच्या सावटाखाली असल्याने संघव्यवस्थापन चिंतेत आहे. सलामीवीर शिखर धवन, युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर कोरोनाबाधित झाले आहेत. नेट गोलंदाज नवदीप सैनीलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. धवन ,ऋतुराज आणि श्रेयस अय्यर आता एकदिवसीय मालिकेसाठी खेळणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्यांना दीर्घ काळ विलगीकरणात राहावे लागणार आहे. तसेच दोनदा आरटीपीसीआर चाचणीत निगेटिव्ह यावे लागणार आहे. सैनी राखीव असल्याने संघाला तशी त्याबाबत मोठी चिंता नाही. कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या अन्य तिघांत क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी.दिलीप,सुरक्षा संपर्क अधिकारी बी. लोकेश आणि मालिशिया राजीव कुमार यांचाही समावेश आहे. टीम इंडियाचे सदस्य सफेद चेंडूच्या मालिकेसाठी 31 मार्चला अहमदाबादमध्ये जमले होते. याच दरम्यान संघातील काही क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते.