
दहिसर येथील शिवसेनेच्या विधानसभा प्रमुख व माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. ‘मी कुठेही जाणार नाही, शिवसेनेशी एकनिष्ठ’ असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर उपस्थित होते.
तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला असून त्या भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची वृत्तं प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर आज तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, आपण शिवसेनेशी एकनिष्ठ असून इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांबाबत आपल्या काही तक्रारी होत्या त्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण मांडल्या, असेही त्यांनी सांगितले.