अलोट गर्दीच्या साक्षीने रेवंत रेड्डी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी, सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांची उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणा राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी शपथ घेतली. तेलंगणाचे राज्यपाल टी सुंदरराजन यांनी रेवंत रेड्डी यांना मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. तेलंगणातील हैदराबाद येथील एलबी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळय़ाला काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.

तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसला 119 जागांपैकी 64 जागा मिळाल्या आहेत. 2013 मध्ये तेलंगणाच्या स्थापनेनंतर काँग्रेस पहिल्यांदाच सत्तेत आली आहे. आतापर्यंत केवळ चंद्रशेखर राव दोनदा मुख्यमंत्री झाले होते. कर्नाटकनंतर तेलंगणा हे दक्षिणेतील दुसरे राज्य आहे, जिथे काँग्रेसने स्वतःचे सरकार स्थापन केले आहे.

11 मंत्र्यांनीही घेतली शपथ

56 वर्षीय रेवंत रेड्डी यांनी एलबी स्टेडियममध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमात सुमारे एक लाख लोक सहभागी झाले होते. शपथ घेण्यापूर्वी रेवंत रेड्डी सोनिया गांधी यांच्यासोबत खुल्या जीपमधून स्टेडियमवर पोहोचले. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत 11 मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये दामोदर राजनरसिम्हा, उत्तम कुमार रेड्डी, भट्टी विक्रमार्क, कोमाटी रेड्डी, वेंकट रेड्डी, सीताक्का, पोन्नम प्रभाकर, श्रीधर बाबू, तुम्मला नागेश्वर राव, काsंडा सुरेखा, जुपल्ली कृष्णा पोंगुलेटी यांचा समावेश आहे.