भाविकांच्या गर्दीने राज्यातील मंदिरे फुलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर/सोनई

सरत्या वर्षाला जल्लोषात निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत सर्वत्र दणक्यात करण्यात आले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी कोल्हापूर, नृसिंहवाडी, शिर्डी, शनिशिंगणापूर, जेजुरी, मोरगाव अशा विविध मंदिरांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीने सर्व मंदिरे फुलली होती.

आजपासून सुरू झालेल्या २०१९ या नवीन वर्षाचेही तितकेच दणक्यात सर्वत्र स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे आज पहाटे करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे दरवाजे उघडताच, भक्तांनी सहकुटुंब देवीचे दर्शन घेऊन नववर्षारंभ केला. कोल्हापूरकरांसह जिल्ह्याबाहेरून आलेल्या हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. सकाळी ही रांग भवानी मंडपापर्यंत आली होती. श्री अंबाबाई मंदिरांसह दख्खनचा राजा श्री जोतिबा, नृसिंहवाडी येथील श्री दत्तमंदिर, कणेरीवाडी येथील सिद्धगिरी मठ आदी धार्मिकस्थळी गर्दी झाली होती.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आज शनिशिंगणापूर येथे शनिदर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. राज्यसह परराज्यांतून आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसरात रांगा लागल्या होत्या. सकाळी अत्यल्प गर्दी असल्यामुळे भाविक चौथऱ्यावर जाऊन शनी महाराजांचे दर्शन घेत होते. मात्र, दुपारनंतर वाढत्या गर्दीमुळे चौथऱ्यावरील दर्शन बंद करून सर्वांना खालून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, वाढत्या गर्दीमुळे मंदिरातील नियोजन कोलमडल्याचे चित्र दिसले. सोनई-शनिशिंगणापूर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने भाविकांना ताटकळत राहावे लागले.

आज २०१९ या नववर्षाचे शुभारंभ झाल्याने शिर्डीवरून येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने शनीमंदिर परिसर वाहनांनी हाऊसफुल्ल गर्दी झाली होती. मंदिरातील सर्व वाहनतळे भाविकांच्या गर्दीने भरून गेले. सोमवारी सरते वर्षामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांनी येथे मुक्काम करून पहाटेच दर्शनाचा आनंद लुटला. राहुरी-शनिशिंगणापूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यातच साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर आदींमुळे रस्त्याला मोठा अडथळा निर्माण झाला होता. सायंकाळपर्यंत दोन लाखांहून अधिक भाविकांनी शनीदर्शनाचा लाभ घेतला.