टेनिस क्रिकेटचा महाकुंभमेळा ‘सुपरडुपर’ हिट, नववा सुप्रिमो चषक उमर इलेव्हनने पटकावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेनिस क्रिकेटला लोकप्रियतेचे अत्युच्च शिखर गाठून देणाऱया कलिनातील नवव्या सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेची सांगता 15 ते 20 हजार क्रिकेटशौकिनांच्या साक्षीने रविवारी पहाटे झाली. शानदार हायटेक आणि कल्पक संयोजन, सुमधुर आणि माहितीपूर्ण हिंदी, मराठी, मालवणी समालोचन, विविध क्षेत्रांतील मान्यवरांची  शुभेच्छा भेट  आणि स्पर्धेतील नामवंत संघांच्या शानदार तुफानी खेळाने एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब मैदानावर उपस्थित हजारो क्रिकेटशौकिनांना मंत्रमुग्ध करून सोडले. टेनिस आयपीएल म्हणून देशविदेशात ओळखल्या जाणाऱया सुप्रिमो चषकाच्या नवव्या पर्वात नवी मुंबईच्या उमर इलेव्हन ट्रायडंट संघाने मुंबईच्या पंधारी किंग्स संघावर 40 धावांनी मात करीत झळाळत्या चांदीच्या सुप्रिमो चषकावर आपले नाव कोरले. शिवाय जेतेपदासाठीचे नऊ लाख रुपयांचे महापारितोषिक पटकावले. स्पर्धेचे शानदार आयोजन महाराष्ट्राचे परिवहन, संसदीय कामकाज मंत्री अॅड. डॉ. अनिल परब  आणि कलिनाचे शिवसेना विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली सुप्रिमोच्या कार्यकर्त्यांनी अफलातून असे केले होते.

कलिनाचे एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब मैदान शनिवारी सायंकाळपासून क्रिकेटशौकिनांच्या गर्दीने ओसंडून गेले होते. सर्वांना प्रतीक्षा होती सुमारे अडीच वर्षांनंतर होणारी लोकप्रिय सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धा कुठला संघ जिंकणार? विशेष म्हणजे मुंबई आणि नवी मुंबईच्या संघांनी उपांत्य फेरीत पालघर आणि कोलकाताच्या मातब्बर संघांना पराभवाचे पाणी पाजत सुप्रिमोची अंतिम फेरी दिमाखात गाठली. उमर इलेव्हन ट्रायडंट, नवी मुंबई संघाने पालघरच्या टीडब्ल्यूजे डॉमिनेटर्स संघावर 4 धावांनी चुरशीचा विजय मिळवत पहिली उपांत्य लढत जिंकली, तर दुसऱया उपांत्य लढतीत या स्पर्धेत  मुंबईच्या पंधारी किंग्स संघाने अँजेल स्पोर्ट्स, कोलकाताचे  आव्हान 13 धावांनी संपुष्टात आणले.

मालिकावीराला मारुती एस्प्रेसो कार

यंदा सुप्रिमो चषकात मालिकावीर किताब पटकावणाऱया उमर इलेव्हनच्या मुन्ना शेखला परिवहनमंत्री अॅड. अनिल परब आणि आमदार-विभागप्रमुख संजय पोतनीस यांच्या हस्ते चकाकती भगवी मारुती एस्प्रेसो कार देण्यात आली. मुन्नाने या स्पर्धेत चार सामने खेळून 74 चेंडूंत 102 धावांची नोंद केली आहे. यंदा शिवसेना सचिव आणि एमसीएच्या मुंबई टी-20 लीगचे चेअरमन मिलिंद नार्वेकर यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट फलंदाज कृष्णा गवळी (पंधारी किंग्स), सर्वोत्कृष्ट गोलंदाज राजू मुखिया (उमर इलेव्हन) आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक किरण पवार (पंधारी किंग्स) यांना अँजेलो कॉम्प्युटर इन्स्टिटय़ूटचे अॅग्नेलो राजेश अथायडे यांच्या हस्ते आकर्षक स्कूटी पारितोषिकादाखल देण्यात आल्या.

मान्यवरांची मांदियाळी आणि सत्कार

सुप्रिमोला शुभेच्छा देण्यासाठी शेवटच्या दिवशी शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, माजी कसोटीपटू संजय मांजरेकर, सुरू नायक, आंतरराष्ट्रीय गोळाफेकपटू पूर्णा रावराणे, शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार प्रकाश फातर्पेकर, अँजेलो इन्स्टिटय़ूटचे अॅग्नेलो राजेश अथायडे, संगीतकार अन्नू मलिक, माजी टेनिस क्रिकेट प्रशासक बाबा रॉड्रिग्ज, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे संयोजक दीपक पवार, क्रिकेट प्रशिक्षक दिलीप पिंगे, माजी ज्युनियर ‘मुंबई श्री’, ज्युनियर ‘महाराष्ट्र श्री’ रोहन गुरव, प्रो- कबड्डीपटू रिशांक देवाडिगा हे मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

माहितीपूर्ण मधुर समालोचन

या स्पर्धेचे ओघवते माहितीपूर्ण मराठी, हिंदी आणि मालवणी समालोचन ज्येष्ठ समालोचक हरीश पंडय़ा यांच्या मार्गदर्शनाखाली चंदू शेटये, कुणाल दाते, मॉण्टी खोपकर, राजेश कुळये, प्रसाद परब, प्रमोद शेडगे, प्रशांत आदवडे, ओंकार पाटील आणि बादल चौधरी यांच्या समूहाने केले. कुडाळ-वालावलच्या बादल चौधरी याच्या विनोदी मालवणी समालोचनाने उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले. स्पर्धेचे उत्तम गुणलेखन संजय म्हात्रे, सोनम चव्हाण, प्रसाद रानडे यांनी केले, तर पंच म्हणून जबाबदारी सतीश कुरूप, करुणाकरन कोटियन, अनिल आवळेगावकर यांनी पार पाडली. ज्येष्ठ क्रिकेटपटू शेखर देशपांडे, जग्गू राणा  हे स्पर्धेचे मुख्य निरीक्षक होते. पल्लवी नायर यांनी या स्पर्धेतील इव्हेंट व्यवस्थापन अतिशय उत्तम रीतीने पार पाडले.

महापारितोषिकांचा महावर्षाव

यंदा सुप्रिमो चषक जिंकणाऱया नवी मुंबईच्या उमर इलेव्हन ट्रायडंट संघाला नऊ लाख रुपये रोख, झळाळता शानदार चांदीचा चषक स्पर्धेचे संयोजक परिवहनमंत्री अॅड. अनिल परब आणि विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस यांच्या हस्ते हजारो क्रिकेट शौकिनांच्या तुफानी जल्लोषात बहाल करण्यात आला, तर उपविजेत्या पंधारी किंग्स संघाला सुप्रिमो चषक आणि सात लाख रुपये रोख असे पारितोषिक देण्यात आले.