
सामना ऑनलाईन । कोलकाता
जेट एअरवेजच्या विमानात दहशतवादी घुसल्याची चर्चा करून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका तरुणाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहे. चौकशीनंतर केवळ गंमत म्हणून त्याने तशी चर्चा केल्याची कबुली दिली आहे. मात्र तरी देखील 26/11 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने सर्व खबरदारी घेतल विमान तपासणी केली आणि त्यानंतरच दहशतवादी घुसल्याची माहिती अफवा असल्याचे सांगितले आहे.
कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर आज सकाळी एकच खळबळ उडाली. जे. पोद्दार नावाचा तरुण कोलकाताहून मुंबईला येणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानातून प्रवास करत होता. अचानक तो विमानात दहशतवादी घुसले असल्याचं बोलू लागला. या संदर्भातील मेसेज करताना आणि बोलताना त्याला काही प्रवाशांनी पाहिले आणि त्याची माहिती ‘क्रू’ मेंबरला दिली. त्यानंतर तातडीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी जे. पोद्दारला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यातून ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. तरी देखील विमानाची संपूर्ण तपासणी केल्यानंतरच उड्डाणाची परवानगी देण्यात येणार आहे, असे विमानतळ प्रशासनाकडून स्पष्ट केले जात आहे.
























































