
पाकिस्तानातील बलुचिस्तानात निम्नलष्करी दल आणि ग्वादर गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाला लक्ष्य करून दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 7 सैनिकांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्वादर जिल्ह्यात ओरमारा शहरात सरकारी तेल कंपनी ( ओजीडीसीएल) च्या कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांनी ल्क्ष्य केले होते. पाकिस्तानकडून या दहशतवादी हल्ल्याची पुष्टी करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यादरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. त्यात दहशतवाद्यांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
दहशतवाद्यांनी बलुचिस्तानमधील ओरामाराच्या डोंगरावरून कपंनीच्या पथकावर हल्ला चढवला. त्यावेळी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आल्याची माहिती ग्वादरमधील एका अधिकाऱ्याने दिली. निम्नलष्करी पथक ग्वादरहून कराचीकडे परतत असताना दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले. हा हल्ला पूर्वनियोजित असून लष्कराचे आणि कंपनीचे पथक कराचीकडे जाणार असल्याची माहिती दहशतवाद्यांना असल्याने ते दबा धरून बसले होते. त्यानंतर दहशतवाद्यांना पथकावर हल्ला चढवला. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा मुकाबला करत ग्वादर कंपनीच्या पथकला सुरक्षितस्थळी पोहचवले. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात मोठ्या संख्येने दहशतवादी सहभागी झाले होते.
चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरमध्ये ग्वादर बंदर महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणी परदेशी अधिकारीही मोठ्या संख्येने काम करतात. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असते. असे असतानाही दहशतवाद्यांनी तेल कंपनीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याने तेल कंपनीला कोणताही धोका पोहचला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच कपंनीच्या कर्मचाऱ्यांच्या पथकालाही सुरक्षितस्थळी पोहचवण्यात आले आहे. सुरक्षा दलाने परिसराची नाकाबंदी करून दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
























































