
जम्मू-कश्मीरमध्ये सीमेवर सातत्याने होणाऱया सीझफायरच्या तसेच कश्मीरातील दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर तीन्ही सैन्यदलांचे विशेष दल नेमण्यात येणार आहे. यात हवाई दलाचे गरुड कमांडोही सक्रिय होणार आहेत. नौदल, हवाई दल आणि लष्कराचे जवान दहशतवादी कारवाया मोडून काढणार आहेत.
संरक्षण मंत्रालयाच्या सैन्यदल विशेष मोहीम विभागाअंतर्गत तिन्ही सैन्यदलाच्या विशेष दलाचे जवान जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी आणि या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याविषयी तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, नौदलाचे मार्कोस कमांडो, हवाई दलाचे गरुड कमांडो यांची लहान पथके कश्मीर खोऱयातील विविध भागांमध्ये तैनात करण्यात आली आहेत.
पहिल्यांदाच विशेष दलाच्या माध्यमातून मोहीम
यापूर्वी लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या जवानांच्या माध्यमातून जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी मोहिमा आखण्यात आल्या. तिन्ही सैन्यदलांच्या जवानांच्या तुकडय़ा या ठिकाणी सक्रिय आहेत, परंतु पहिल्यांदाच तिन्ही सैन्यदलांचे एकच विशेष कृती दल तयार करण्यात आले असून या विशेष दलाच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया मोडून काढण्यासाठी मोहीमा आखण्यात येणार आहेत.
ऑपरेशन राख हाजीन
हवाई दलाच्या विशेष दलाने यापूर्वी कश्मीर खोऱयात अनेक मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. ‘ऑपरेशन राख हाजीन’अंतर्गत हवाई दलाच्या विशेष दलातील जवानांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या कामगिरीसाठी जे. पी. निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.
























































