
मीना आंबेरकर
थंडीचे उबदार दिवस सुरू होत आहेत. मस्तपैकी उबदार पदार्थांपासून बनवलेल्या वडय़ा, बर्फीचा आस्वाद घेऊया…
मिठाई हा प्रकार सर्वांनाच खायला आवडतो. ज्यांना गोड आवडतच नाही त्यांचा अपवाद सोडून बहुतेक जण मिठाई आवडीने खातात. आनंदाच्या प्रसंगी मिठाई खाऊन किंवा मिठाई वाढून तो प्रसंग साजरा करण्याची प्रथा आहे. आता मिठाई म्हटलं की आपल्याला बाजारातल्या किंवा हलवायाकडच्या मिठाईची आठवण होते. बर्फी, काजू कतली, मैसूर यासारखे पदार्थ डोळय़ासमोर येतात परंतु प्रत्येकवेळी बाजारची मिठाई खाण्यापेक्षा घरी बनवलेली मिठाई खाणे योग्य ठरते. कारण बाजारच्या मिठाईत साखरेचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. तसेच त्यात वापरण्यात येणारा खवा निकृष्ट दर्जाचा असण्याची शक्यता असते अशावेळी योग्य त्या प्रमाणात साखरेचा वापर चांगल्या प्रतीचा खवा वापरून आपण घरी मिठाई बनवू शकतो. आपल्याकडे अनेक प्रकारच्या वडय़ा केल्या जातात. बाजारात मिळणाऱया बर्फीसारख्या पदार्थाला हा योग्य पर्याय आहे असे मला वाटते म्हणून आज मी काही गोड वडय़ांच्या रेसिपी सांगणार आहे. त्या तुम्ही नक्कीच करून पाहाल, अशी मला खात्री आहे. आपण पूर्वापार बनणाऱया गूळपापडीच्या वडय़ांपासून सुरूवात करू.
गूळपापडीच्या वडय़ा
साहित्य – 1 वाटी कणिक नेहमीपेक्षा रवाळ असल्यास चांगली. अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे, अर्धी वाटी शेंगदाणा कूट, 1 वाटी बारीक चिरलेला गूळ, 1 चमचा आले किसलेले, दोन डाव साजूक तूप.
कृती – प्रथम तूप टाकून त्यात कणिक आणि खोबरे घालावे आणि खमंग भाजावे. काळे होऊ देऊ नये. नंतर गुळात थोडे पाणी घालून हाताला चिकट लागेपर्यंत पाक करावा. किसलेले आले घालवे. पाकात भाजलेले कणिक व खोबरे घालून हे मिश्रण खाली उतरून ढवळावे व वाटाला तूप लावून चोपून वडय़ा थापाव्यात. वडय़ा थापताना एकसारख्या थापाव्यात कोठे जाड कोठे पातळ अशा होता कामा नये. या वडय़ा रूचकर तर लागतातच परंतु यात पोषण मूल्येही भरपूर असतात. गुळामुळे आयर्न मिळते.

बटाटय़ाच्या वडय़ा
साहित्य – उकडलेल्या बटाटय़ाचा किसून घेतलेला गोळा. अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे, 4-5 वेलदोडय़ांची पूड, दीड वाटी साखर.
कृती – प्रथम 2/3 बटाटे उकडून सोलून घ्या. नंतर त्याचा कीस किसणीने करवा. किसणी जाड असू नये. प्रथम बटाटय़ाचा गोळा चांगला तुपावर परतून घ्यावा. खोबरेपण परतून घ्यावे. साखर भिजेपर्यंत पाणी घालून गोळीबंद पाक करावा. त्यात वरील सर्व साहित्य घालून गोळा सारखा ढवळीत राहावा. सुकेपर्यंत ठेवावा. गॅस कमी – जास्त करावा आणि सुकल्यावर खाली उतरवून पाटाला तूप लावून गोळा थापावा. सगळीकडे सारखा थापावा. गरम असतानाच वडय़ा कापाव्या.

गाजराच्या वडय़ा
साहित्य – 2 वाटय़ा गाजराचा किस, 4 वाटय़ा दूध, 4 वाटय़ा साखर, अर्धी वाटी पिठीसाखर, जायफळ पूड अर्धा चमचा, 2 टे. स्पून तूप, अर्धा लिंबाचा रस.
कृती – गाजरे किसून घ्यावीत. पातेल्यात तूप घालून कीस परतावा. 4/5 वाफा आणाव्यात. दूध थोडे आटवून घ्यावे. आटवलेले दूध गाजराचा किसात घालावे. मिश्रण सर्व घालून शिजत ठेवावे. खाली उतरवून त्यात पिठीसाखर घालावी. ताटाला तुपाचा हात लावून वडय़ा थापाव्या. नंतर कोमट असताना कापाव्यात, रंग फारच सुंदर येतो. या प्रकारात अर्धी वाटी मिल्क पावडर घालावी.

मोहनथाळ- बेसन बर्फी, बेसनाची वडी
साहित्य – 2 वाटय़ा डाळीचे जाडसर पीठ, 100 ग्रॅम खवा, केशर किंवा केशरी रंग, 1 वाटी साजूक तूप, वेलची पूड, 3 वाटय़ा साखर, बदामाचे काप.
कृती – 1 वाटी तुपावर डाळीचे पिठ घालून गुलाबी रंगावर भाजावे. खवा हाताने गुठली मोडून मिसळावा. 3 वाटय़ा साखेचा 1 वाटी पाणी घालून 2 तारी पाक करावा. केशर किंवा रंग व वेलची पूड घालावी. पाकात पीठ आणि खवा घालून चांगलं ढवळावे. ही बर्फी फारच सुंदर लागते वर बदामाचे काप लावावेत.

टोमॅटोच्या वडय़ा
साहित्य – टोमॅटोच्या बारीक चिरलेल्या फोडी 1 वाटी, टोमॅटो लालबुंद आणि ताजे घट्ट असावेत. दीड वाटी साखर, अर्धी वाटी ओला नारळ खवून.
कृती – टोमॅटोच्या फोडी अगदी अर्धी वाटी पाणी घालून खूप शिजवून घ्याव्यात. त्याचे पाणी घट्टसर गाळून घ्यावे. खोबरे चांगले काळजीपूर्वक ढवळावे आणि परतून घ्यावे. साखरेच्या पाकात पाणी घालण्याऐवजी टोमॅटोचा रस घालावा. तार येईपर्यंत पाक करावा. पाक बरोबर झाला पाहिजे. पाक बिघडला तर वडय़ा हमखास बिघडतात. सुकत आले, कडेला कोरडे झाले की पातेले उतरवावे. परतलेला नारळही पाकात घालावा. आंबट-गोड चवीच्या टोमॅटोच्या वडय़ा रूचकर व चवीला छान लागतात आणि दिसायलाही आकर्षक दिसतात.
























































