टीईटी परीक्षा घोटाळा; आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी कृषी विभागातील आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना आज पुणे पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. खोडवेकर हे यापूर्वी शिक्षण विभागात कार्यरत होते. त्यांच्या अटकेमुळे या घोटाळय़ात आणखी कोणते बडे मासे हाती लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकाहून एक खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत. पैसे घेऊन टीईटी परीक्षार्थींना पात्र ठरविल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली.

आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर हे यापूर्वी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून कार्यरत होते.  खोडवेकर यांनी शिक्षक भरती परीक्षेत घोटाळा केल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातून त्यांना अटक करण्यात आली.

या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, हा घोटाळा कसा झाला याची माहिती खोडवेकर यांच्याकडून पोलीस काढणार आहेत. आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

एका प्रकरणात राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांची चौकशी सुरू होती. या प्रकरणाची चौकशी शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिक सुशील खोडवेकर यांच्याकडे सोपविण्यात आली होती, त्याचा गैरफायदा खोडकेकर यांनी घेतला, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. खोडवेकर सध्या मंत्रालयातील कृषी विभागाच्या उपसचिव पदावर आहेत. 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले खोडवेकर बीड जिह्यातील खोडवा सावरगाव येथील आहेत. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मुंबईतील माटुंगा येथील राम नारायण लोहीया कॉलेजमधून त्यांनी एमएस्सीची पदवी घेतली. 2011 साली  ते आयएएस झाले. त्यांनी नांदेड – वाघाळा महापालिकेत आयुक्त म्हणून तर, परभणी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले आहे. टीईटी घोटाळा होत असताना ते शिक्षण विभागाचे उपसचिव होते.

दरम्यान, खोडवेकर यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गुह्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी व परीक्षा नियोजनाचे कंत्राट असलेल्या जी.ए. सॉफ्टवेअर या कंपनीस शिक्षण विभागाने काळ्या यादीत टाकले होते. त्या कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्यासाठी तुकाराम सुपे यास सूचना केल्याची माहिती असून, याचा तपास करायचा आहे. तसेच अटक आरोपीने शिक्षक पात्रता परीक्षेतील कोणत्या व किती अपात्र परीक्षार्थींना पात्र असल्याचे  प्रमाणपत्र देण्याबाबत सांगितले, याबाबत तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. यानुसार न्यायालयाने 31 तारखेपर्यंत कोठडी देण्यास मंजुरी दिली आहे.