टीईटी पेपरफुटी प्रकरण, मुख्य सूत्रधार भाजप पदाधिकाऱ्याचा भाऊ

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार आरोपी महेश गायकवाड हा भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांचा भाऊ असल्याचे समोर आले आहे. आपला भाऊ भाजपचा पदाधिकारी असल्यानेच आरोपी महेशचे धाडस वाढल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

शिक्षक म्हणून नोकरी मिळण्यासाठी, तसेच सेवेत असलेल्या शिक्षकांना नोकरी टिकवण्यासाठी टीईटी परीक्षा बंधनकारक असल्याने शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न होऊ शकतो, याचा फायदा घेण्यासाठी ‘टीईटीचा पेपर परीक्षेआधी देतो’, असे सांगून पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

याप्रकरणी अटक करण्यात आलेला या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड आणि त्याचा भाऊ संदीप भगवान गायकवाड (रा. बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा) हे भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांचे भाऊ असल्याचे उघड झाल्याने जिह्यात खळबळ उडाली आहे. कराड तालुक्यातील बेलवाडी येथे गायकवाड बंधू जय हनुमान करिअर ऍकॅडमी चालवतात. ऍकॅडमी चालवता चालवता महेश व संदीप गायकवाड यांनी हा ‘वेगळा’ मार्ग अवलंबल्याचे समोर आले आहे. तथापि, भाऊ भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे त्यांचे धाडस वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मसूर गटातून अनेकजण इच्छुक आहेत. त्यामध्ये प्रमोद गायकवाड हेही इच्छुक आहेत. मात्र, या निवडणुकीचे पडघम वाजत असताना भावांचे प्रताप उघड झाल्यामुळे त्यांना धक्का बसला आहे.

रविवारी (दि. 23) झालेल्या टीईटी परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वी देतो, असे सांगून काहीजणांनी विद्यार्थ्यांना बोलावले होते. त्यांच्याकडून शैक्षणिक कागदपत्र आणि रोख रक्कम स्वीकारून फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने मुरगूड पोलिसांच्या मदतीने कागल तालुक्यातील सोनगे गावच्या हद्दीतील शिवकृपा फर्निचर मॉलमध्ये छापा टाकून संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केले. या प्रकरणातील फरार असलेला मुख्य सूत्रधार महेश गायकवाड याला पोलिसांनी बेलवाडी येथून अटक केली. आतापर्यंत या प्रकरणात 18 जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.