नाशिक डायोसेशन कंपनीची तीनशे कोटींची मालमत्ता हडपली; ठक्कर, पोद्दार, शहा बिल्डरांसह 37 जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे तयार करून नाशिक डायोसेशन ट्रस्ट कंपनीची तीनशे कोटी रुपयांची सहा एकर जागा सवा कोटीत हडपल्याचे चव्हाटय़ावर आले आहे. या कंपनीसह शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीशी नामसाधर्म्य असलेल्या संस्थेच्या विश्वस्तांसह 37हून अधिक घोटाळेबाजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमधील ठक्कर, शहा, पोद्दार या बहुचर्चित बिल्डरांचाही यात सहभाग आहे.

नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नाशिकमध्ये मोठी मालमत्ता आहे. याच कंपनीशी नामसाधर्म्य असलेली नाशिक डायोसेशन काwन्सिल विश्वस्त संस्था आहे. कंपनीची मालमत्ता ही विश्वस्त संस्थेची असल्याचे भासविण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. त्याआधारे कंपनीची मालमत्ता असलेल्या शरणपूर भागातील सहा एकर जागेचा गैरव्यवहार करण्यात आला.

घोटाळय़ातील संशयितांची यादी

संशयितांमध्ये पंकज मालपुरे, पिंकेश शहा, प्रवीण उनवणे, माधुरी पाटील, कविता पाटील, राजवी गृहनिर्माण, राजवी डेव्हलपर्सचे संचालक राजेंद्र शहा, शशीकांत शहा, श्रेणीक शहा, सिरीन शहा, रजनी खैरनार, वल्लभदास ठक्कर, वैभव पाटील, किरण चव्हाण, गौरव ठक्कर, भक्तीभाव हॉर्टिकल्चर, दिपशिका फार्म्स, कर्मभूमी फार्म्सचे संचालक जितेंद्र ठक्कर, निर्माण आश्रय डेव्हलपमेंटचे संचालक नेमीचंद पोद्दार, नवरत्न लॅण्ड्स अॅण्ड इस्टेटचे संचालक नेमीचंद पोद्दार, तसेच विक्री करणारे नाशिक डायोसेशन काwन्सिलचे विश्वस्त चेअरमन अविनाश बलपुंदी, डॉ. मनोहर हनबरहट्टी, सुगंध शिंदे, नरेंद्र शिंदे, प्रदीप कांबळे, राजेंद्र सपताळ, डॉ. अरविंद मोरे, भास्कर साळवे, मार्गारेट गांगुर्डे, शार्लेट नाडे, डेव्हीड क्षेत्रे, मार्गेट मते, प्रसाद अमोलिक, फ्रान्सिस जॉन, शशिकांत वंजारे, हरियाली अॅग्रीकल्चर्सचे संचालक संदीप सराफ, राजेंद्र ठक्कर यांचा समावेश आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या तीन एकर जागेचाही समावेश

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या ताब्यात असलेल्या तीन एकर जागेचाही यात समावेश आहे. सध्या तेथे पोलीस उपायुक्तांसह अधिकाऱयांची कार्यालये, तसेच वाहतूक शाखेचेही कार्यालय आहे. बनावट दस्त तयार करून तीनशे कोटींची सहा एकर जागा हडपली, या जागेच्या भाडे रकमेचा अपहार केला, अशी तक्रार सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार रतन देवरे यांनी 10 जून रोजी सरकारवाडा पोलिसात दिली, त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.