ठाणे, कल्याण, डोंबिवलीकरांची गटारी घरातच; 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढला

904

झणझणीत मटणाचा रस्सा, चिकन फ्राय, तंदुरी… सागुतीवडे, माशांचे कालवण आणि सोबत एकामागून एक रिचणारे प्याले … असा ‘फूल्ल’टू बेत आखणाऱ्या ठाणेकरांसह कल्याण, डोंबिवलीकरांना यंदाची गटारी मात्र ‘गपगुमान’ घरातच साजरी करावी लागणार आहे. 12 जुलैपर्यंत कडकडीत लॉकडाऊन करूनही कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने ठाणे आणि कल्याण – डोंबिवली महापालिका आयुक्तांनी आणखीन एक आठवडा म्हणजे 19 जुलैपर्यंत टाळेबंदी वाढवली आहे. नेमक्या त्याच दिवशी घरोघरी गटारीचे बेत असताना सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोंबडी सोडाच पण अंडीही मिळणे मुष्कील असल्याने खवय्यांचा उत्साह ‘लॉकडाऊन’ होणार आहे.

ठाणे पालिका क्षेत्रामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने 12 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या शहरामध्ये 5 हजार अॅक्टिव्ह केसेस असून 465 जणांच बळी गेला आहे. तर दुसरीकडे कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 11 हजारांच्या घरात पोहचली आहे. सध्या येथे 5 हजार 219 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोविड नियंत्रणात आणण्यासाठी आणि रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळावेत यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र तरीही कोविड रुग्णसंख्येमध्ये रोज 250 ते 400 पर्यंतची भर पडत आहे. त्यामुळे ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी 2 ते 12 जुलैपर्यंत कडकडीत लॉकडाऊन जाहिर केला. त्यापाठोपाठ कल्याण- डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही लॉकडाऊन 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन जारी केला. लॉकडाऊन- 5 ची अंमलबजावणी काटेकोर होत असली तरी कोविड रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण अद्यापी आलेले नाही. त्यामुळे 12 जुलैच्या मध्यरात्री संपणारा लॉकडाऊन 19 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याचे सुधारीत आदेश पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी जाहिर केले आहे. त्यापाठोपाठ कल्याण- डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही आणखीन एक आठवडा लॉकडाऊन वाढवला असल्याचे जाहिर केले आहे.

खवय्यांची गोची

21 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत असून 20 जुलैला आषाढ अमावस्या म्हणजे गटारी आहे. पण नेमकी गटारी अमावस्या सोमवारी येत असल्याने बहुतेक ठाणेकरांनी रविवारी 19 जुलैला गटारी साजरी करण्याचे बेत आखले. कोरोनाच्या संकटात हॉटेल, ढाबे बंद असणार हे गृहीत धरून गच्चीवर अनेकांनी छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तळीरामांनी ऑनलाईन मद्याचा साठा करण्यासही सुरुवात केली आहे. पण कडकडीत लॉकडाऊनमध्ये बहुतेक मासळीबाजार, चिकन, मटणची दुकाने बंद असणार असल्याने खवय्यांची गोची होण्याची शक्यता आहे.

पुणे, पिंपरीत सोमवारपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन

कोरोना विषाणूचा फैलाव गेल्या काही दिवसांमध्ये दुपटीपेक्षा जास्त वेगाने वाढल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह ग्रामीण क्षेत्रातील कोरोनाचा विळखा बसलेल्या गावांमध्ये सोमवार (दि. 13) रोजी मध्यरात्रीपासून पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन प्रशासनाने घोषित केला. लॉकडाऊन पहिल्या पाच दिवसांसाठी कडक राहणार असून, या काळात दूध, औषधे आणि दवाखाना एवढ्याच गोष्टी सुरू राहणार आहेत. अन्य सर्व व्यवहार, बाजारपेठा बंद राहतील.

आपली प्रतिक्रिया द्या