‘आई एकविरा देवी’चे परस्पर केले ‘आनंदनगर’, ठाणे पालिकेच्या मैदानाचे नाव बदलले;शिंदे गटाच्या मंत्र्यांचा ‘प्रताप’

जी-5 या मैदानाचे नामकरण तीन वर्षांपूर्वी ‘आई एकविरा देवी मैदान’ असे करण्यात आले होते. तसा ठरावही प्रभाग समितीने केला. पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येदेखील त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले, पण अधिकृत ठराव झुगारून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या मैदानाचे नाव ‘आनंदनगर खेळाचे मैदान’ असे केल्याचे उघडकीस आले आहे. मैदानाचे नाव बदलल्यामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत असून हे नाव पूर्वीप्रमाणेच ‘आई एकविरा देवी’ मैदान असे ठेवावे, अन्यथा फलकालाच काळे फासू असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

घोडबंदर रोडवरील कावेसर येथे पी. जी-5 हे पालिकेचे खेळाचे मैदान आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ओवळा-माजिवडा विधानसभा संपर्कप्रमुख व माजी नगरसेवक नरेश मणेरा यांनी पाठपुरावा करून ‘आई एकविरा देवी मैदान’ असे केले होते. याबाबतचा ठराव महासभेमध्ये 24 नोव्हेंबर 2021 रोजी मंजूर झाला. असे असतानाही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परस्पर या मैदानाचे नाव बदलले. त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

आयुक्तांना पाठवले पत्र

कावेसर येथील खेळाच्या मैदानाचे अधिकृत नाव बदलल्यामुळे नागरिकांमध्ये चीड व्यक्त होत आहे. प्रशासनाने कोणाच्या दबावाला बळी पडून मैदानाचे नाव बदलण्यास परवानगी दिली, असा थेट सवाल नरेश मणेरा यांनी केला असून यासंदर्भात ठाणे महापालिका आयुक्त डॉ. सौरभ राव यांना पत्र पाठवले आहे. तसेच पूर्वीचेच नाव कायम ठेवा, अन्यथा फलकाला काळे फासू, असा इशारा दिला आहे.