ठाण्याच्या विद्यार्थ्यांची सोलार कार आशियात नंबर वन; आशियातील मोठय़ा स्पर्धेत मारली बाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ठाणे येथील ए. पी. शाह इन्स्टिटय़ूटमधील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सोलार कारने आशिया खंडातील सर्वात मोठय़ा स्पर्धेत बाजी मारली आहे. या विद्यार्थ्यांनी बनवलेली इलेक्ट्रिक सोलार कार नुकत्याच झालेल्या ‘इलेक्ट्रिक सोलार व्हेईकल चॅम्पियनशिप’ स्पर्धेत नंबर वन ठरली.

पंजाबमधील चंदिगड विद्यापीठात ही स्पर्धा पार पडली. त्यात आशिया खंडातील विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कार सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारच्या कारना प्रवेश दिला जाणार यासंदर्भात आधीच सर्व संस्थांना काही निकष घालून देण्यात आले होते. ए. पी. शाह इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतील मॉडिफाइड ऑटो क्लबच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली सोलार कार त्या निकषांमध्ये उजवी ठरली. या कारला प्रथम क्रमांक मिळाला. त्याचप्रमाणे क्रॉस पॅड प्रकारामध्येही विक्रमी वेळ नोंदवत ही कार अव्वल ठरली. संपूर्ण स्पर्धेत ऍडव्हेंचर प्रकारामध्येही ही कार एक नंबर ठरली. ही कार बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना कॉवेस्ट्रो आणि वारी या दोन कंपन्यांनी सहकार्य केले. कॉवेस्ट्रो ही कंपनी पॉलिमर तयार करते, तर सोलार पॅनल बनवण्यामध्ये वारी ही कंपनी आघाडीवर आहे.

ही सोलार कार बनवण्यासाठी 35 विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस झटत होते. विशाल चोथमल हा या विद्यार्थ्यांचा कॅप्टन होता. तसेच मिथिलेश वेखंडे, सुयश गांधी, तन्मय किणी, सुरज पांडे, सुमित फोरा यांनी या टीममध्ये प्रमुख भूमिका बजावली. मेकॅनिकल इंजिनियरींग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अमोल शिंदे तसेच इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग विभागाचे प्राध्यापक ए. एम. देशपांडे आणि समीर नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार बनवली गेली.

आठ-नऊ महिन्यांच्या मेहनतीतून ही कार बनली. गेल्या वर्षी याच स्पर्धेत आमच्या कारला अपात्र ठरवले गेले होते. कारण काही निकषांमध्ये आम्ही कमी पडलो होतो. पण यावर्षी अव्वल ठरलो. या कारमध्ये 400 वॅट क्षमतेची इलेक्ट्री बॅटरी आहे. ती सौरऊर्जेवरही चार्ज करता येते.

प्रा. अमोल शिंदे