ठसा – वसंत मोकाशी पुणेकर

>>  दिलीप ठाकूर

एका सत्य घटनेवर आधारित चित्रपटाची पटकथा लिहिताना त्यात मूळ घटनेतील नाटय़ कायम ठेवून प्रेक्षकांना क्लायमॅक्सपर्यंत खिळवून ठेवणारी मांडणी व बांधणी खूपच महत्त्वाची असते. शंकर नाग दिग्दर्शित ‘ऑक्सिडेन्ट’ (1984) या कन्नड भाषेतील चित्रपटाची पटकथा मुंबईत 1980 साली झालेल्या एका दुर्दैवी अपघातात चार कामगारांचा मृत्यू झाला त्यावर आधारित होती आणि या चित्रपटाला 1985 चा सर्वोत्कृष्ट सामाजिक आशयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला. कर्नाटक सरकारचेही पाच पुरस्कार प्राप्त झाले. त्यात एक पुरस्कार होता सर्वोत्कृष्ट पटकथा लेखन आणि हा पुरस्कार पटकावला वसंत मोकाशी पुणेकर यांनी! त्यांचे 7 जुलै 2024 रोजी कर्नाटक राज्यातील धारवाड येथे निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय सत्तर इतके होते. स्थानिक प्रादेशिक भाषेनुसार त्यांचे नाव वसंत मोकाशी पुणेकर असे घेतले जाते.

वसंत मोकाशी पुणेकर हे कन्नड साहित्यिक शंकर मोकाशी पुणेकर यांचे सुपुत्र. लहानपणापासून त्यांनाही लेखनाची आवड. मुंबई व बंगलोर येथे त्यांचे प्रामुख्याने वास्तव्य असे. आपले पिता शंकर मोकाशी पुणेकर यांच्या “Gangavva Gangamayi” या साहित्यावर आधारित त्यांनी त्याच नावाच्या चित्रपटाचे लेखन केले. 1994 साली हा चित्रपट पडद्यावर आला. या चित्रपटात अनंत नाग व सुलभा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आणि सरोदवादक राजीव तरंथ यांचे संगीत होते. हा चित्रपट त्यांच्या कारकीर्दीतील अतिशय महत्त्वाचा टप्पा होता.

वसंत मोकाशी पुणेकर हे काही काळ कर्नाटक आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवाचे संचालक होते. चित्रपटसृष्टीसाठी विविध स्तरांवर काम करण्याचा त्यांचा अनुभव होता.

त्यांची पटकथा असलेल्या ‘ऑक्सिडेन्ट’ या चित्रपटाची तब्बल चाळीस वर्षांनंतरही कन्नड भाषेतील चित्रपटसृष्टीत आठवण काढली जाते. अनंत नाग यांची या गुन्हेगारी नाटय़ असलेल्या चित्रपटात राजकीय नेत्याची लक्षवेधक भूमिका होती. शंकर नाग पत्रकार, रमेश भट्ट पोलीस इन्स्पेक्टर अशा भूमिका होत्या. अरुंधती नाग, अशोक मंद्दाना, शिमोगा व्यंकटेश इत्यादी कलाकारांच्या भूमिका असलेला हा सामाजिक राजकीय चित्रपट वसंत मोकाशी पुणेकर यांच्या बंदिस्त पटकथेसाठी कायमच ओळखला जातो. समीक्षक व प्रेक्षक या दोघांचाही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. तेव्हा एका मुलाखतीत वसंत मोकाशी पुणेकर यांनी, या कथेचे मूळ मुंबईत घडलेल्या एका अपघाताच्या वृत्तपत्रातील एका बातमीत होते असे म्हटले. त्यांना श्रध्दांजली वाहताना अरुंधती नाग यांनी म्हटले की, त्यांच्यासोबत ‘ऑक्सिडेन्ट’ या चित्रपटासाठी काम करतानाचा अनुभव कायमच लक्षात ठेवण्यासारखा आहे. पटकथेतील बारकावे त्यांना ज्ञात असत.

साहित्यिक जाण असणारे पटकथा लेखक अशी कन्नड भाषेतील चित्रपटसृष्टीत वसंत मोकाशी पुणेकर यांची ओळख होती.

[email protected]