लग्नमंडपात वधूवरांचा नेत्रदानाचा संकल्प; वऱ्हाडींनाही केले आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्यापैकी अनेकांना वाटत असते की, इतरांना काहीतरी मदत करावी, मात्र नीट मार्ग सापडत नसतो. त्यातही कित्येक जण दुसऱयांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. ते आपल्या आयुष्यातील एखाद्या महत्त्वाच्या क्षणी लोकांच्या मदतीचा संकल्प करतात. असंच एक उदाहरण हुबळी शहरात दिसून आलंय. तिथे लग्नाच्या दिवशी वधूवरांनी नेत्रदानाचा संकल्प करून मानवतेचा आदर्श घालून दिला. एवढेच नव्हे तर या जोडप्याने लग्नाला उपस्थित राहिलेल्या लोकांनी नेत्रदान करून एखाद्याच्या आयुष्यातील अंधार दूर करावा, असे आवाहनही केले.

अलीकडेच कन्नड सुपरस्टार पुनित राजकुमारचे निधन झाले. पुनितने मरणोत्तर नेत्रदान केले. पुनितच्या मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. कर्नाटकातील हुबळी शहरात एका नवविवाहित जोडप्यानं नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वी खूप महत्त्वाचा निर्णय घेतला. लग्नाच्या पूर्वसंध्येला जोडप्याने नेत्रदान करण्याचा संकल्प केला. त्यानुसार त्यांनी लग्नाच्या दिवशी नेत्रदान संकल्प पत्र भरून दिले. लग्नाच्या हॉलवर एक विशेष काऊंटर उभारण्यात आला होता. नेत्रदान करण्यास इच्छुक असलेली मंडळी त्या काऊंटवर जाऊन फॉर्म भरू शकत होते. तसे आवाहन करण्यात येत होते. वधूवराच्या पुटुंबीयांनीदेखील या मोहिमेत सहभाग घेतला.

हा खूप आनंदाचा क्षण असल्याची भावना नवरदेव सुचित याने व्यक्त केली. सुचित म्हणाले, आज आमच्या पुटुंबातील सर्व सदस्यांनी नेत्रदानासाठी स्वाक्षऱया केल्या. माझ्या पुटुंबीयांनी मला पाठिंबा दिला, त्यामुळे मी आनंदी आहे.

अभिनेता पुनित राजकुमारने मरणोत्तर नेत्रदान केल्यानंतर कर्नाटकात जणू नेत्रदानाला चळवळीला वेग आला आले आहे. बंगळुरू येथील नारायण नेत्रालयाचे संस्थापक डॉ. भुजंगा शेट्टी यांच्या मते, पुनित राजकुमारच्या  निधनानंतर 4 ते 5 दिवसांत तब्बल 1500 लोक नेत्रदानाचा संकल्प पत्र भरण्यासाठी पुढे आले. नेत्रदान चळवळीला गती येत असल्याचे त्यांनी सांगितले.

नेत्ररोगतज्ञ डॉ. श्रीनिवास जोशी म्हणाले,   देशात नेत्रदानाबाबत अजून तेवढी जागृती नाही.  जर लोकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा निर्णय घेतला तर देश कॉर्नियल ब्लाइंडनेसपासून मुक्त होईल.  लग्नाला उपस्थित डॉक्टरांनीही लोकांना नेत्रदानाचे आवाहन केले.