
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर शहरातील आमलेश्वर नगर भागातील बंद घर पाहून चोरट्यांनी ते घर फोडले. विजया दशमीच्या दिवशीच ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमलेश्वर नगर भागातील ओमप्रकाश चनाप्पा शेटकर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादीची पत्नी ही घराला कुलूप लाऊन बाहेरगावी गेलेली होती. अज्ञात चोरट्यांनी बंद असणारे घर पाहून घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील दिड तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, २ तोळे वजनाच्या दोन अंगठ्या पळवून नेल्या. रात्री उशीरा घरी परत आल्यानंतर चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली आणि रात्रीच ११.३० वाजता त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिराजदार हे करीत आहेत.






























































