
सामना ऑनलाईन । मुंबई
मध्य रेल्वेच्या कुर्ला हार्बर स्थानकाच्या लिंबू सरबताने मध्य रेल्वेवरील खुली सरबत विक्री बंद पाडली. परंतु पश्चिम रेल्वेवरील सरबत विक्रीला कोणतीही आडकाठी नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवाय कुर्ला येथील कॅण्टीनच्या लिंबू सरबताचे नमुने प्रयोगशाळेत तपासायला पाठविल्याने हा अहवाल प्रतिकूल आला तरच कॅण्टीनचालकांचे लायसन्स रद्द होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
कुर्ला रेल्वे फलाटाच्या कॅण्टीन छतावरचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मध्य रेल्वेने अशा प्रकारे खुली सरबत विक्री बंद करण्याचे फर्मान सोडले असून मध्य रेल्वेच्या स्टॉलवरील स्वच्छतेबाबत झाडाझडती मोहीम सुरू केली आहे. कुर्ला रेल्वे स्थानकातील संबंधित कॅण्टीन स्टॉलचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या स्टॉलला सील ठोकण्यात आले असून सरबताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या सरबताचा अहवाल प्रतिकूल आला तर अधिक कठोर कारवाई म्हणजे अनामत रक्कम जप्त करण्यापासून दंडात्मक कारवाई किंवा थेट लायसन्स रद्द करणे अशी पावले उचलण्यात येतील, असे वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र जर अहवाल प्रतिकूल आला नाही तर काय करणार यावर या अधिकाऱ्याने उत्तर देणेच टाळणे पसंद केले.
पश्चिम रेल्वेवर तुफान सरबत विक्री!
मध्य रेल्वेने मुंबई डिव्हिजनमध्ये कालाखट्टा, रोझ मिल्क, लिंबूपाणी विक्री बंद केली असली तरी पश्चिम रेल्वेने मात्र अशा प्रकारची कोणतीही तसदी घेतलेली नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेचे स्टॉलधारक अधिक चांगल्या प्रकारे लिंबू सरबत तयार करतात किंवा त्यांच्याकडील व्हिडीओ व्हायरल झाला नसल्याने बंदी झाली नसल्याचे गमतीने म्हटले जात आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेवरील खुल्या सरबत विक्रीला बंदी नसल्याने तेथे सरबताची प्रचंड विक्री होत असल्याचे चित्र आहे. सीएसएमटी स्थानकात महानंद, अमूलसारख्या स्टॉलवर बाटलीबंद पेयासाठी प्रवाशांच्या उडय़ा पडल्याचे चित्र शुक्रवारी होते.
























































