
रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाला अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार करून 25 हजारांची रोकड लुटणाऱ्याला एकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्याचे साथीदार फरार आहेत. ही घटना दोन दिवसांपुर्वी सहा वाजण्याच्या सुमारास कोथरूडमधील सुतारदरा परिसरात घडली. त्याशिवाय टोळक्याने हातात कोयता घेउन परिसरात दहशत माजविल्याने नागरिकांनी घरे बंद करून घेतली होती. प्रवीण तुकाराम कुडले (30) अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दीपक कोकरे (वय 22, रा. सुतारदरा ) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी सहाच्या सुमारास दीपक रस्त्याने चालला होता. त्यावेळी पाठीमागून गेलेल्या प्रवीणसह इतर साथीदारांनी त्याला अडविले. त्यानंतर प्रवीणने लपविलेला कोयता काढून दीपकवर वार केला. त्यानंतर त्यांच्याकडील 25 हजारांची रक्कम चोरून पसार झाले होते. आरोपींनी हातात कोयते घेउन परिसरात आरडाओरड करत दहशत पसरवली. त्यामुळे स्थानिकांनी घाबरून घरे बंद केली होती. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक विनायक कोळी तपास करीत आहेत.


























































