मोदी सरकारकडून मनरेगाची मोडतोड; 12 कोटी मजुरांवर अन्याय, काँग्रेसचे मोहन प्रकाश यांची टीका

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा (मनरेगा) गळा आवळून देशातील गोरगरीबांच्या रोजगारावर थेट कुऱ्हाड चालवली आहे. केवळ नाव बदलून नाही, तर तथाकथित सुधारणांच्या नावाखाली तब्बल 12 कोटी मजुरांच्या पोटावर पाय देण्याचे पाप मोदी सरकारने केले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रवत्ते मोहन प्रकाश यांनी केला.

रविवारी काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत मोहन प्रकाश यांनी मनरेगा आणि नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावर मोदी सरकारचा समाचार घेतला. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चौधरी आदी उपस्थित होते.

मोहन प्रकाश म्हणाले, मनरेगा गेली दोन दशके ग्रामीण भारतासाठी जीवनवाहिनी ठरली आहे. मात्र 2014 पासून पंतप्रधान मोदी या योजनेच्या मुळावरच उठले आहेत. कधीकाळी मनरेगाला काँग्रेसच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणणाऱ्या मोदी सरकारने गेल्या 11 वर्षांत या योजनेला पद्धतशीरपणे कमकुवत केले. मनरेगा आज दरवर्षी केवळ 50 ते 55 दिवसांच्या कामापुरती मर्यादित राहिली आहे. हा देशातील ग्रामीण भागाशी केलेला विश्वासघात आहे. मोदी सरकारच्या या जनविरोधी धोरणांविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावरची, न्यायालयीन लढाई दोन्ही लढणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सूडबुद्धीने कारवाया केल्या. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अडकवण्याचा कट रचण्यात आला. मात्र भाजपची कठपुतली बनलेल्या ईडीचे आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत मोदी-शाहांचा खोटारडेपणा उघड केला, असा घणाघात मोहन प्रकाश यांनी केला.