कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कर्मचाऱ्यांनी हळूहळू कामावर परतण्यास सुरूवात केली असताना 19 हजार कर्मचाऱ्यांपर्यंत गेलेला आकडा न वाढता पुन्हा 18 हजारावर आला आहे. गुरूवारी 18,882 कर्मचारी कामावर हजर होते. परंतु 29 नोव्हेंबर रोजी 19,163 कर्मचारी कामावर हजर झाले होते.

दुसरीकडे आझाद मैदानात संपाचे नेतृत्व करणारे भाजपा प्रेणित अजयकुमार गुजर आणि त्यांचे कायदेशीर सल्लागार अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी 2 आणि 3 डिसेंबर रोजी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानात जमण्यास सांगितले. त्यातच गेले दोन दिवस मुंबई पाऊस कोसळत असल्याने आझाद मैदानातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची संख्या खूपच घटली आहे. त्यामुळे नवीन कुमक आणण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना सोशल मिडियावरून आवाहन केले जात आहे.

आतापर्यंत 9,141 कर्मचारी निलंबित

एसटी महामंडळाने आज एकूण 498 कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या आतापर्यंत 9,141 इतकी झाली आहे. तर आज 36 जणांची सेवा समाप्ती करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 1928 रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. दरम्यान, सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 1348 बसेस गुरूवारी राज्यात विविध मार्गांवर सोडण्यात आल्या आहेत.