
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. स्थलांतरितांच्या अटकेनंतर लोकांची निदर्शने सुरूच आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल गार्ड व्यतिरिक्त मरीन तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सैन्य तैनात करण्याबाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि तेथील राज्यपालांमध्ये मतभेद आहेत. कॅलिफोर्नियाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे.

राज्याकडून सतत विरोध होत असतानाही ट्रम्प निदर्शकांना नियंत्रित करण्यासाठी संघीय सुरक्षा कर्मचारी तैनात करत आहेत. दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमध्ये 2000 नॅशनल गार्ड तैनात करण्याची घोषणा केली होती. याला राज्यपालांनी विरोध दर्शविला होता. दरम्यान ट्रम्प यांनी तेथे आणखी 2 हजार सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्थलांतरितांवरील कारवाईविरुद्धच्या निदर्शनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोमवारी 2,000 अतिरिक्त नॅशनल गार्ड तैनात करण्याची मागणी केली आहे.
लॉस एंजेलिसच्या महापौर करेन बास म्हणाल्या की, त्या अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी नव्हे तर ट्रम्प प्रशासनाशी सतत संपर्कात आहेत. नॅशनल गार्ड तैनात करण्यापूर्वी प्रशासनाशी त्यांची चर्चा झाली. त्या म्हणाल्या, “मी असा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करत होते की येथे नॅशनल गार्डची गरज नाही. जर नॅशनल गार्ड येथे आले तर, हिसांचारात अधिक वाढ होईल. यामुळे आपल्या शहरात अराजकता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असेल.”
लॉस एंजेलिस पोलिस विभागाचे (LAPD) प्रमुख जिम मॅकडोनेल यांनी सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितले की, तुलनेने अद्याप फारशा लोकांना अटक करण्यात आलेली नाही. तपास अशाच पद्धतीने सुरू राहिला तर अनेकांना अटक केली जाईल. फेडरल बिल्डिंगसमोरील गर्दी पांगवण्यासाठी पोलिस घातक नसलेल्या गोळीबाराचा वापर करत आहेत. प्रत्युत्तरादाखल निदर्शक प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या फेकत आहेत. गर्दीतील काही लोक पोलिसांवर विटाही फेकत आहेत.




























































