
राज्यात अतिवृष्टी, पुरामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मात्र दुसरीकडे राज्याची पाणी चिंता मिटली आहे. राज्यातली धरणे तुडुंब भरली असून या धरणांमधील पाणीसाठा 92.84 टक्क्यांपर्यंत आला आहे. त्यामुळे मागील तीन आठवडय़ांपासून संपूर्ण राज्यात आता केवळ तीनच टँकर पाणी पुरवठा करीत आहेत.
राज्यात परतीच्या पावसाने शेतीला जोरदार तडाखा दिला आहे. ठाणे जिह्यापासून अगदी थेट विदर्भ-मराठवाडय़ात परतीच्या पावसाने कापणीला आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत. परतीच्या मार्गावर असलेल्या पावसाने ठाणे जिह्यातील भात, विदर्भ-मराठवाडय़ात कापूस, मका, सोयाबीन, भुईमूग, कांदा अशी पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र दुसरीकडे जोरदार पावसामुळे राज्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे राज्यातल्या वाडय़ा-वस्त्यांवरचा टँकरने पाणी पुरवठा जवळजवळ बंद झाला आहे.
टँकरची संख्या सहावरून तीनवर
संपूर्ण राज्यात केवळ पुणे जिह्यात आजच्या घडीला केवळ तीन टँकर धावत आहेत. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यात एकाही टँकरची गरज सध्या भासत नाही. मागील तीन आठवडय़ांपासून राज्यात केवळ तीनच टँकर धावत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात सहा टँकर धावत होते. आता टँकरची गरज कमी झाली आहे, अशी माहिती राज्याच्या जलसंपदा विभागातून देण्यात आली.




























































