
शरीर सुदृढ आणि बळकट ठेवण्यासाठी हल्ली अनेक पर्यायांचा अवलंब केला जातो. त्यापैकीच जिममध्ये जाऊन व्यायाम करणे बऱ्याच जणांना सोपे जाते, पण असे असले तरी जिममध्ये व्यायाम करताना काळजी घेणे आवश्यक आहे, नाहीतर जीव जाण्याची पाळी येऊ शकते, असा प्रकार एका महिलेच्या बाबतीत घडला आहे.
मेक्सिको शहरात राहणारी 35 ते 40 दरम्यान वय असलेली एक महिला जीममध्ये वर्कआऊट करण्यासाठी जात असे. 21 फेब्रुवारीला ती नेहमीप्रमाणे तिच्या मुलीसोबत फिटनेस सेंटरमध्ये गेली होती. तिथे गेल्यावर तिने 180 किलो वजनाचा बारबेल उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच क्षणी ती खाली पडली. महिला खाली पडताच 180 किलो वजनाचा बारबेल तिच्या मानेवर पडला. त्यामुळे तिची मान दबली गेली. त्यानंतर काही सेकंदातच तिचा मृत्यू झाला. या अपघातावेळी तिची मुलगीही तिच्या जवळच उभी होती.
ही सर्व घटना इतक्या वेगाने घडली की, तिच्या जवळ उभ्या असलेल्या जिममधील इतर लोकांना तिची मदत करण्यासाठी वेळही मिळाला नाही. या अपघातानंतर महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. ही घटना जिममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. यामध्ये महिला वजन उचलण्याचा प्रयत्न करत असताना बारबेलच्या साहाय्याने खाली कशी पडते हे दिसत आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.



























































