
सामना प्रतिनिधी । चाकूर
चांदीविक्री करणाऱ्या व्यापाऱ्याकडील नोकरच्या अंगावर खाज सुटण्याचे रासायनीय द्रव्य टाकून त्याच्या मोटारसायकलवरील तीन लाख रूपये किंमतीचे १४ किलो वजनाचे चांदीचे दागीने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर येथील व्यापारी कालीचरण मदनलाल वर्मा हे नोकर सुरेश गोरिया याच्या सोबत एम. एच. २४ ए. एल. ४३५६ क्रमांकाच्या मोटारसायकवरून चांदीचे दागीने विक्री विक्री करण्यासाठी आले होते, शहरातील काही व्यापाऱ्यांकडे दागिण्याची विक्री करून वर्मा हे नोकरासह एका हॉटेल मधून जेवन करून बाहेर आले असता त्यांच्या मोटारसायकलचे चाक पंचर झाले होते. यामुळे त्यांनी नोकर गोरिया यास गॅरेजवर पाठविले. याच वेळी त्याच्या अंगावर कोणीतरी खाज सुटण्याचे रासायनीय द्रव्य टाकल्यामुळे तो गॅरजमध्ये जाऊन शर्ट झटकत होता. या दरम्यान त्यांच्या मोटारसायकलवर ठेवलेली चांदीची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. यात दोन लाख ८९ हजार ४५० रूपयाची १३ किलो ६५० ग्रॅम चांदी चोरी गेली असल्याची फिर्याद कालीचरण वर्मा यांनी दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रामेश्वर तट पुढील तपास करीत आहेत.
































































