
कुरियर पार्सलमधील महागड्या वस्तू चोरून त्या लॅमिग्टन रोड येथे विकणाऱ्या डिलिव्हरी बॉयसह त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट -4 च्या पथकाने पकडले आहे. आरोपींकडून पोलिसांनी तीन लाख किमतीचे महागडे मोबाईल व लॅपटॉप हस्तगत केले.
‘डिलिव्हरी डॉट कॉम’ या कुरियर पंपनीच्या पार्सलची डिलिव्हरी पोहचविण्याचे काम रमजान शेख (29) हा करत होता. कुरियर पार्सलमध्ये महागडे मोबाईल, लॅपटॉप असतील तर ते चोरायचे काम रमजान करायचा. हा प्रकार समोर आल्यानंतर वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर युनिट-4चे प्रभारी निरीक्षक इंद्रजित मोरे, एपीआय अजय बिराझदार, यशवंत शिंदे व पथकाने रमजानचा शोध सुरू केला. तेव्हा कोरबा मिठागर परिसरात रमजान लपून बसला असल्याची माहिती खबऱ्याने देताच पथकाने तेथे जाऊन रमजानला पकडले. त्याच्या अंगझडतीत दोन आयफोन सापडले. त्यानंतर त्याने चोरीचे मोबाईल व लॅपटॉप लॅमिंग्टन रोड येथील देवेंद्र सिंग, अनिल आणि तेजस या तिघांना विकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी लॅमिंग्टन रोड गाठून त्या तिघांना पकडले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल मिळाला. या चौघांकडून तीन लाख 23 हजार किमतीचे महागडे मोबाईल व लॅपटॉप जप्त करण्यात आले.



























































