…तर सीमाभागातील भयंकर परिस्थितीची जबाबदारी केंद्र आणि कर्नाटक सरकारचीच असेल; शरद पवारांचा खणखणीत इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील भयंकर परिस्थिती असून महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहायचा नसेल तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी 24 तासाच्या आत हल्लेखोरांवर कारवाई करून हे प्रकार थांबवावे अन्यथा तेच पुढील परिस्थितीला जबाबदार असतील असा खणखणीत इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली.

संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर जो प्रकार घडला तो निषेधार्ह आहे, अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. हे प्रकरण काही आठवड्यांपासून हे प्रकरण एका वेगळ्या स्वरुपात नेण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून सुरू असल्याची माहिती मिळत असल्याचे ते म्हणाले. त्यासंदर्भात बोलताना त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कशी कशी विधानं केली आणि कशा भूमिका घेतल्या ते पवार यांनी यावेळी सांगितलं.

तसेच सीमाप्रश्नाशी माझा संबंध अत्यंत जूना आहे. मला अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागलं. माझा अभ्यास अधिक आहे. सीमा भागात काही घडलं की तिथले लोक मला संपर्क करतात. आज मला माहिती मिळाली ती भयंकर आहे. ‘बेळगावमधील परिस्थिती गंभीर आहे, एकीकरण समितीच्या कार्यालयासमोर पोलीस आहेत, रस्त्यांची नाकाबंदी, महाराष्ट्रातील प्रत्येक वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. यासंदर्भात निवेदन देण्यासाठी गेल्याल ते निवेदन देखील देता येत नाही, अशी परिस्थिती आहे. 19 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन होणार आहे, त्यामुळे मराठी भाषिकांवर दडपशाही सुरू आहे. त्यावेळी आपण येऊन आम्हाला धीर द्यावा’, अशी विनंती येथील मराठी बांधव करत असल्याचा मेसेज पवार यांनी वाचून दाखवला.

अपेक्षा ही होती की असं होत असताना काही तरी पुढाकार घेऊन दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधला असं मला सांगितलं, चांगली गोष्ट आहे, मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाही, असंही पवार म्हणाले.

आज महाराष्ट्रातील वाहनांवर जे हल्ले झाले यामुळे भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. हे वेळीच थांबलं नाही तर एक संयमाची भूमिका महाराष्ट्रातून घेतली आहे आणि अजूनही तयारी आहे. मात्र संयमाला मर्यादा असतात. येत्या 24 तासात हल्ले थांबले नाहीत आणि संयम सुटून परिस्थिती बिघडली तर त्याची जबाबदारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर, तिथल्या सरकारवर पूर्णपणे असेल, असा इशारा त्यांनी दिला.

महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका संयमाची आहे. संयमाला मर्यादा येऊ नयेत अशी मनापासून इच्छा आहे. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर विधानं, भूमिका होत असेल तर देशाच्या ऐक्याला धोका आहे. जर हे काम कर्नाटक सरकारकडून सुरू राहिलं तर केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असंही ते स्पष्टपणे म्हणाले. महाराष्ट्रातील खासदारांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन इथली माहिती, प्रश्न त्यांच्या कानावर घालावे, अशी विनंती आहे. तरी जर काही होत नसेल तर केंद्र आणि कर्नाटक सरकारच याला जबाबदार असतील, असंही त्यांनी सांगितलं.