वातावरण बदलू लागले आहे, परिवर्तानाची लाट स्पष्ट दिसत आहे – पृथ्वीराज चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prithviraj-chavan

नोटबंदीचा निर्णय जसा बालिशपणे घेण्यात आला तसाच दोन हजारांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी रविवारी पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारवर आणि भाजपवर तोफ डागली आहे. देशात वातावरण बदलू लागले आहे, हे आपण कर्नाटकमध्ये पाहिले आहे. येत्या काळात काँग्रेससाठी आशादायी चित्र असेल असेही ते म्हणाले. सोलापूरमध्ये पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

देशात बदल घडतोय हे कर्नाटकात दिसून आले आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी आपली जादू चालवण्याचा प्रयत्न केला. बंगळुरु शहरात कित्येक किमीचा रोड शो, अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. मात्र, त्यांची जादू काही चालली नाही. वातावरण बदलू लागले आहे, परिवर्तानाची लाट स्पष्ट दिसते आहे. आता नरेंद्र मोदी हे गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. पुढच्या तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये काय करायचं? लोकसभेच्या वेळी काय करायचं? या चिंतेत आहेत. अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंधळलेल्या अवस्थेतूनच केंद्रातल्या मंत्रिमंडळात बदल केला. काही जणांचे अधिकार काढून घेतले. दोन हजारांच्या नोटा वितरणातून बंद केल्या. मुळात या नोटा आणल्याच कशाला होत्या? दोन हजारांची नोट काही कुणी भाजीपाला खरेदीसाठी वापरत नाही. दोन हजारांच्या नोटा या फक्त काळा पैसा साठवण्यासाठी वापरल्या जात होत्या, हे सगळ्यांना ठाऊक आहे. नोटबंदीमध्ये देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. त्यानंतर कोरोना आला, अजूनही अर्थव्यवस्था संकटात आहे. त्यामुळे देशासमोर महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

धर्माच्या नावावर भाजपचे लोक आता काय काय करतील हे माहित नाही. एक निश्चित आहे की नवीन कार्यकर्ते भाजप सोडून आपल्याकडे येत आहेत. लोकांना आता भाजप ही दिशाहीन पार्टी झाल्याचं समजले आहे. देशाचे प्रश्न सुटणार नाहीत याची खात्री लोकांना पटली आहे. आपण कर्नाटकमध्ये दणदणीत विजय मिळवला. तिथे ऑपरेशन कमळ वगैरे काही चालणार नाही. भाजपसाठी दक्षिणेचे दार बंद झाले आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्या निवडणुकाही आपल्याला जिंकायच्या आहेत, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

2024 मध्ये आपण जर नरेंद्र मोदींना घालवलं नाही तर देशात लोकशाही राहणार नाही. देशात हुकुमशाहीची वाटचाल आपण रोज पाहतो आहोत त्यामुळे हे बदलायचं असेल तर 2024 मध्ये जिंकावंच लागेल असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदींनी फक्त मोठे पुतळे उभारले, मोठी भवने उभारली. मात्र देशातला तरुण बेरोजगार आहे. कर्ज काढून आणि कर लावून देश चालवता येत नाही असाही टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे.