
बिहार येथे 60 फूट लांबीचा पूल चोरांनी दिवसाढवळ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. अवघ्या तीन दिवसांत हा 20 टनांचा पूल कापून स्थानिकांच्या डोळ्यांदेखत चोरून नेण्यात आला आहे.
बिहार येथील रोहतास जिल्ह्यात ही घटना घडली आहे. येथे आरा नावाच्या कालव्यावर 1972 दरम्यान बनवलेला एक 60 फुटांचा पूल चोरी करण्यात आला आहे. हा पूल जुना असल्याने तो काही ठिकाणी मोडला होता. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ या पुलाचा वापर करत नव्हते. कुणी चुकून त्या पुलावरून जाऊ नये म्हणून त्यांनी स्थानिक प्रशासनाला तो पूल हटवण्याची विनंतीही केली होती.
त्यामुळे, जेव्हा हे चोर सिंचन विभागाचे अधिकारी असल्याचं भासवत पुलाची पाहणी करायला आले, तेव्हा कुणालाही ते चोर असावेत अशी शंकाही आली नाही. त्यामुळे त्यांनी कुणालाही लक्षात न येऊ देता काम करायला सुरुवात केली. त्यांनी जेसीबी, गॅस कटर अशी उपकरणं आणली होती.
जवळपास तीन दिवस कुणालाही याचा संशय येऊ न देता त्यांनी पूल कापला, जेसीबीने उखडून काढला आणि त्यानंतर ट्रेकमध्ये लादून घेऊन गेले. यानंतर खरोखरच्या सिंचन विभागाला जाग आली आणि त्यांनी आता पोलिसात तक्रार केली आहे.
























































