
सार्वजनिक ठिकाणी अनेकदा मोबाईल चोरीच्या घटना घडतात. एकदा का मोबाईल चोरी झाला तर तो परत मिळणे तसे मुश्किलच. पण नोएडातील एका नागरिकाला भलताच अनुभव आला आहे. फोन आवडला नाही असे कारण देत चक्क चोरानेच त्यांना फोन परत आणून दिला आहे. आपल्यासोबत घडलेला हा भन्नाट किस्सा देबयान रॉय यांनी ट्विटरवर शेअर केला असून या स्टॅण्डर्ड चोराची सध्या नेटिझन्समध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
देबयान यांनी ट्विटरवर सगळी घटना सांगितली आहे. ते म्हणाले, सेक्टर 52 येथे नोएडा मेट्रो स्टेशनजवळ मी उभा राहून मोबाईलवर चॅटिंग करत होतो. त्याचवेळी काळा मास्क घातलेली एक व्यक्ती माझ्या हातातून फोन हिसकावून घेऊन पळाली. मी त्याचा पाठलाग केला. पण पुढे जे घडलं ते हैराण करणार होतं. देबयान म्हणाले, पाठलाग करताना अचानक चोर मागे फिरला अन् ’भाई मुझे लगा वन प्लस 9 प्रो मॉडेल है’ असं म्हणतं त्याने फोन रस्त्यावर फेकला आणि धूम ठोकली. ही घटना देबयान यांनी ट्विटरवर शेअर केल्यानंतर तू नक्की कोणता फोन वापरत होता असा प्रश्न एका युजरने विचारला. त्यावर सॅमसंग गॅलेक्सी एस 10 प्लस वापरत असल्याचे उत्तर त्याने दिले. अनेकांनी या ट्विटकर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत.
























































