
दुचाकीस्वार तरुणाला मारहाण करत लुटणाऱ्या दोन चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना काही दिवसांपुर्वी ताडीवाला रस्ता परिसरात घडली होती. किशोर संभाजी पात्रे (वय 25), अक्षय उर्फ पुंज्या बाबा वाघमारे (वय 20, दोघेही रा. दुष्काळ वसाहत, ताडीवाला रस्ता) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
या प्रकरणी सुनील म्हेत्रे (वय 24, रा. पुणे स्टेशनजवळ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सुनील म्हेत्रे ताडीवाला रस्ता परिसरातून पहाटे अडीचच्या सुमारास घरी जात होते. त्यावेळी दोघांनी त्यांना अडवून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांच्याकडील अडीच हजार रुपयांची रोकड लुटून नेली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक धनवडे यांनी केली.
























































