
ग्राहकाचे एटीएम कार्ड क्लोनिंग करणाऱ्या तिघांना मालाड पोलिसांनी अटक केली. धर्मेंद्र सिंग, ध्रुव पॉल, मनीषकुमार अशी त्या तिघांची नावे आहेत. फसवणुकीचे पैसे ते बिहारला पाठवत असायचे असे तपासात समोर आले आहे.
तक्रारदार हे मालाडच्या चिंचोली परिसरात राहतात. 2019 मध्ये त्याच्या बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने 1 लाख रुपये काढून घेतल्याबाबत त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घडल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ निरीक्षक धनंजय लिगाडे यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक निरीक्षक विवेक तांबे, पोलीस हवालदार अधिक काsंडे, तोंडवलकर, सहित आडिवरेकर यांच्या पथकाने तपास सुरु केला.
तक्रारदाराने ज्या पेट्रोल पंप आणि बारमध्ये कार्डचा वापर केला त्याची पोलिसांनी माहिती काढली. तपासादरम्यान पोलीस बोरिवली येथील एका बारमध्ये गेले. त्या बारचा कॅशियर धर्मेंद्र कुमारला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक एटीएम कार्ड स्वॅपची मशीन जप्त केली.
त्याच्या चौकशीत ध्रुवचे नाव समोर आले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर मनीषकुमारचे नाव समोर आले. पोलिसांनी एक लॅपटॉप, पाच डेबिट/क्रेडिट कार्ड आणि काही ग्राहकांचे पिन नंबर जप्त केले आहेत. फसवणूकप्रकरणी मालाड पोलिसांनी त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
























































