अंगावर डंपर घातल्याप्रकरणी तिघांना अटक ; 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

तहसीलदार समीर घारे व दोन तलाठ्यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या गुंडू पोमन्ना राठोड (27, रा. चौके), गुरुप्रसाद जर्नादन आचरेकर (43, रा. आचरा), योगेश घनश्याम भिसळे (29 रा. हडी कोतेवाडा) या तिघांना मालवण पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईतील पळवून नेलेला डंपर पोलिसांनी चौके येथून ताब्यात घेतला आहे. गुन्ह्यातील चौथा संशयित डंपर मालक अमोल चव्हाण याचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री हडी कालावल खाडीपात्रालगतच्या मार्गेश्‍वर मंदिरांच्या पाठीमागील खाडीकिनारी अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात कारवाईस गेलेल्या तहसीलदार समीर घारे यांच्यासह दोन तलाठ्यांवर वाळू माफियांकडून डंपर चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुंडू पोमन्ना राठोड, अमोल चव्हाण, योगेश भिसळे, गुरुप्रसाद आचरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा महसूल कर्मचार्‍यांनी तीव्र निषेध केला होता. सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटलांनी संबंधितांवर अटकेची कारवाई होईपर्यंत कामबंद आंदोलनही केले होते. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी 24 तासांच्या आत संशयित तीन आरोपींना अटक केली व डंपरही ताब्यात घेतला.

शुक्रवारी दुसर्‍या दिवशीही महसूल कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू ठेवले होते. याची माहिती तालुक्याच्या ग्रामीण भागातून कामासाठी आलेल्या ग्रामस्थांना नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांची कामे रखडली. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.