जालन्यातील वरगणे सावंगी येथे तीन बालविवाह रोखले, जालना दामिनी पथकाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सावंगी (वरगणे) येथील आज 16 फेब्रुवारी रोजी 16 वर्षे 7 महिने, 16 वर्षे 5 महिने आणि 14 वर्षे 6 महिने वय असलेल्या तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह  अनुक्रमे 24 फेब्रुवारी  व 27 फेब्रुवारी आणि 5 मार्च 2023 रोजीच्या  मुहूर्तावर आयोजित  करण्यात आले होते. हे तीन बालविवाह रोखण्यात जिल्हा पोलीस दलाच्या दामिनी पथक, अवैध मानवी व्यापार प्रतिबंध शाखा आणि बाल विकास विभागाला यश आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रंजना पाटील यांनी जिल्हा बालसरंक्षण कक्षाचे अधिकारी गजानन इंगळे, सचिन चव्हाण यांना सोबत घेऊन पथकासह  सावंगी (वरगणे) हे गाव गाठले. गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जाऊन पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी या तिनही मुलींचे प्रवेश निर्गम उतारे हस्तगत केले. पाटील यांनी यावेळी गावातील पोलीस पाटील, सरपंचासह प्रतिष्ठित नागरिक आणि वधुपिता,
नातेवाईकांची बैठक घेऊन, त्यांना कायद्याच्या दृष्टीने अल्पवयीन मुलीचे लग्न करणे योग्य नसल्याचे पटवून दिले.
यावेळी ग्रामस्थ, वधुपिता आणि नातेवाईक यांचे मतपरिवर्तन होऊन, त्यांनी मुली, वयात आल्यानंतरच लग्न करण्याची हमी दिली आणि आयोजित विवाह सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या
मार्गदर्शनाखाली दामिनी पथक आणि अवैध मानवी व्यापार प्रतिबंध शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक रंजना पाटील, सहायक फौजदार रवी बबनराव जोशी, सहायक फौजदार संजय गवळी, आरती साबळे, रेणुका राठोड, चालक संजय कुलकर्णी आदींनी कामगिरी केली आहे. दरम्यान, या तीन वधू पित्यासह मुलांचे नातेवाईक यांची जालना येथे बालहक्क संरक्षण समितीच्या कार्यालयात उद्या शुक्रवारी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.