तीन तळीराम कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई, मनपा उपायुक्तांनी टाकली होती धाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, परभणी

मनपा आयुक्त रमेश पवार यांनी अखेर त्या तीन अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना निलंबित केले. उपायुक्त भरत राठोड यांनी 18 जुलै रोजी सायंकाळी अग्निशमन विभागास भेट दिली असता अग्निशमन कार्यालयामध्ये आपल्या मित्रांसमवेत दारु आणि जुगारामध्ये आनंद व्यक्त करताना काही कर्मचारी आढळून आले होते. त्यातील 3 कर्मचाऱ्यांना अखेर निलंबित करण्यात आले. विशेष म्हणजे हे कर्मचारी दारू पिताना आणि जुगार खेळतानाचे छायाचित्रणही उपलब्ध झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई शिवाय पर्याय नव्हता. तसेच उपायुक्त भरत राठोड यांनी सदरील कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव आयुक्त रमेश पवार यांच्याकडे पाठविला होता.

दरम्यान, आयुक्त पवार यांनी सदरील तीन कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावून समाधानकारक खुलासा करण्याचे आदेश बजावले होते. परंतु एकाचाही खुलासा समाधानकारक झाला नाही. विशेष म्हणजे सदरील कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करतानाच त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक त्रि-सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये एम.बी. राठोड (मुख्य लेखा परीक्षक) अध्यक्ष, के.जी. फुटाणे नगररचनाकार, बी.एस. यादव सहा. लेखापाल यांचा समावेश आहे. तातडीने चौकशी करून अहवाल कार्यालयास सादर करावा, असे आदेश आयुक्त रमेश पवार यांनी दिले आहेत.

प्रभारी अग्निशमन अधिकारी गौरव देशमुख यांनाही 19 जुलै रोजी अग्निशामक निवासस्थानातील गैरवर्तनाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांचे उत्तर असमाधानकारक आले होते. कंत्राटी कर्मचारी नियुक्ती आदेशातील अटी व शर्तीमधील तरुतुदीचा भंग केल्याचे दिसून आल्यामुळे त्यांची दोन महिन्याच्या कालावधीसाठी सेवा खंडित करण्यात आली. या शिवाय कोंडवाडा विभागातील स्वच्छता कर्मचारी शेख इस्माईल शे. हबीब, कोंडवाडा विभागातील क्षेत्र कार्यकर्ता विनय ठाकूर यांनाही खुलासा समाधानकारक मिळाल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे.