पहिलीपासून तीन भाषा जगात कुठेच नाहीत! त्रिभाषा सूत्र आढावा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांचे ठाम मत

‘तीन भाषा शिकण्यात काहीच गैर नाही. मात्र त्या पहिलीपासूनच असाव्यात का हा खरा मुद्दा आहे. जगात कुठल्याही देशात पहिलीपासून तिसऱया भाषेचा आग्रह धरला गेलेला नाही,’ असे ठाम मत त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी महायुती सरकारने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी मांडले आहे.

‘मुंबई तक’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘पहिलीपासून अनेक भाषा शिकताना मुलांचा लिंग, वचन, शब्द अशा अनेक बाबतीत गोंधळ उडू शकतो. त्यामुळे सर्जनशील काही शिकण्याऐवजी मुले नको त्या गोष्टीत अडकून पडू शकतात, त्यांच्यावर ताण येतो, असे तज्ञांचे मत असल्याचे जाधव म्हणाले.

आपल्याकडे मुलांना मातृभाषेबरोबर इंग्रजी पहिल्या इयत्तेपासून शिकवली जाते, मग हिंदी शिकायला काय हरकत आहे, असा युक्तिवाद केला जातो. त्यावरही जाधव यांनी उत्तर दिले. ‘मातृभाषा आणि इंग्रजी असताना तिसरी भाषा वाढवू नये. जगात कुठेही सुरुवातीपासून तीन भाषांचा आग्रह धरलेला नाही, असे जाधव यांनी नमूद केले.