
मुलुंडमध्ये मेट्रो पिलरचा भाग कोसळून जीवितहानी झाल्याची घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्ये मेट्रो लाईन-4 च्या बिमला तीन मोठे तडे गेल्याचे रविवारी निदर्शनास आले. यासंदर्भात एका स्थानिक नागरिकाने व्हॉट्सअॅपवरून पालिकेकडे तक्रार केली. या प्रकारामुळे एमएमआरडीए आणि मेट्रो प्रशासनाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
एलबीएस रोडवरील आर सिटी मॉलजवळील मेट्रो मार्गिका-4 च्या सुपरस्ट्रक्चर बिममध्ये तडे गेल्याचे दिसून आले. एमएमआरडीएच्या अखत्यारित मेट्रो प्रशासनाकडून मुंबई महानगरात विविध मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू आहेत. ही कामे घिसाडघाईने व नियोजनशून्य पद्धतीने केली जात असल्याचा आरोप होत आहे. याचदरम्यान मुलुंड येथील घटनेपाठोपाठ घाटकोपरमध्ये मेट्रो मार्गिकेच्या बिमला तडे गेल्याने नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तडे एका दक्ष नागरिकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे नजीकच्या काळातील संभाव्य दुर्घटना टळली. मुलुंडच्या घटनेपासून धडा घेऊन मेट्रो आणि एमएमआरडीए प्रशासन अजून गंभीर का बनले नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश
मेट्रो लाईनच्या बिमला तडे गेल्याच्या प्रकाराची पालिका प्रशासनाने तातडीने गंभीर दखल घेतली आहे. मेट्रो लाईन-4च्या संपूर्ण बांधकामाची तपासणी करा आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, असे आदेश पालिकेने मेट्रो प्रशासनाला दिले आहेत.
तातडीने पाहणी
श्रेयस सिनेमा मेट्रो स्थानकाजवळ एमएमआरडीएच्या प्रकल्प पथकाने तातडीने पाहणी केली. त्यानंतर संबंधित भागातील अतिरिक्त स्लरी काढून टाकण्यात आली. संबंधित बिम पूर्ण सुरक्षित असल्याचा दावा एमएमआरडीए प्रशासनाने केला आहे.





























































