मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भिलवले येथील फार्म हाऊसची चौकशी करणारे पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खालापूर तालुक्यातील भिलवले गावाच्या हद्दीत असलेल्या ‘ठाकरे फार्म हाऊस’बाबत चौकशी करणाऱ्या तीन जणांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनुज कुमार, यशपाल सिंग, प्रदीप धनावडे अशी त्यांची नावे आहेत. या तिघांची रायगड पोलीस कसून चौकशी करीत आहेत. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ उपस्थित आहेत. ठाकरे फार्म हाऊसवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

खालापूर तालुक्यातील भिलवले गावाच्या हद्दीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘ठाकरे फार्म हाऊस’ आहे. मंगळवारी सायंकाळी एका टुरीस्ट कारमधून आलेले तीनजण ‘ठाकरे फार्म हाऊस’बाबत विचारपूस करीत होते. ठाकरे फार्म हाऊसवरील सुरक्षा रक्षक रात्री गस्त घालत होते. त्यावेळी भिलवले डॅमवरील पूलावर आले असता तेथे उभ्या असलेल्या एका कारमधील 3 जणांनी सुरक्षारक्षकाला ठाकरे फार्म हाउस कोठे आहे असे विचारले. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने आपल्याला माहित नाही असे सांगितले.

काही वेळाने ते तिघे ठाकरे फार्म हाऊसजवळ आले. त्यांनी इम्तियाज नावाच्या व्यक्तीची चौकशी केली आणि मुंबईकडे निघाले. तसेच ठाकरे फार्महाऊसबाबत माहिती नाही, असे सांगणाऱ्या सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली. सुरक्षा रक्षकांनी सतर्कता दाखवत याबाबतची माहिती आणि गाडी क्रंमाक मुंबई पोलिसांना कळवला. त्यानंतर रायगड पोलिसांनी नवी मुंबई टोलनाक्यावर गाडीसह तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच मातोश्री बंगल्यावर धमकीचे फोन आले होते. त्यानंतर या व्यक्तींनी ठाकरे फार्म हाऊसबाबत चौकशी केल्याने संशय व्यक्त होत आहे. ते फार्म हाऊसची रेकी करण्यासाठी आले होते काय, याचीही चौकशी करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या