
अल्पवयीन मुलाला बोलावून त्याच्याकडे दीड लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास धानोरीतील भैवनगरमध्ये घडली. रोहन गुंजाळ (वय 19, रा. येरवडा), चेतन रणपिसे (वय 20, रा. येरवडा), आशुतोष भुजबळ (वय 19, रा. भैवनगर, धानोरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 17 वर्षांच्या मुलाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूवी आरोपींनी अल्पवयीन मुलाला धानोरीतील भैवनगरमध्ये बोलावून घेत दीड लाखांची खंडणी मागितली. मात्र, मुलाने रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे तिघांनी मिळून त्याला लोखंडी पाईपने मारहाण केली. तसेच मुलाच्या आईला फोन करून शिवीगाळ केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. निकम अधिक तपास करीत आहेत.



























































