नक्षलविरोधी कारवाईला जर्मनीचे बळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील नक्षलवादविरोधी चळवळीला बळ देण्यासाठी फ्रेंच बनावटीचे ‘एच 145’ हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता हे हेलिकॉप्टर चालवण्यासाठी राज्य सरकारच्या विमान चालन संचालनालयातील तीन वरिष्ठ वैमानिकांना जर्मनीत प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. या तीनही वैमानिकांना जर्मनीतील डोनावर्थ-मँनचिंगमध्ये 75 दिवसांचे खडतर प्रशिक्षण दिले जाईल. नक्षलग्रस्त तसेच जंगलाच्या भागातून हेलिकॉप्टर उडवण्याचे खास प्रशिक्षण या तीन वैमानिकांना देण्यात येईल.

प्रशिक्षणावर साडेसात लाखांचा खर्च

पण केवळ हेलिकॉप्टर खरेदी करून उपयोग नाही तर त्यासाठी निष्णात वैमानिकांचीही गरज आहे. त्यासाठी विमान चालन संचालनालयातील तीन वैमानिकांना 5 जून ते 14 ऑगस्ट या काळात जर्मनीत 75 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. तीनही वैमानिकांना प्रत्येकी 75 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल. या वैमानिकांच्या प्रशिक्षणावर राज्य सरकार सुमारे 7 लाख 30 हजार 500 रुपये खर्च करणार आहे

एअरबस कंपनीकडून हेलिकॉप्टरची खरेदी

नक्षलविरोधी अभियानासाठी मागील आठ वर्षांपासून पवनहंस कंपनीचे हेलिकॉप्टर भाडय़ाने घेण्यात येत आहे. त्यासाठी दरवर्षी सुमारे 25 कोटी रुपये खर्च होतो. त्यामुळे राज्य सरकारने नक्षलविरोधी अभियानासाठी ‘एच 145’ या हेलिकॉप्टरची खरेदी करण्यात येणार आहे. एअरबस हेलिकॉप्टर या कंपनीकडून या हेलिकॉप्टरची खरेदी करण्यात येणार आहे. यामध्ये दोन पायलट व दहाजण प्रवास करू शकतील. नक्षलवादविरोधी अभियानासोबत नैसर्गिक आपत्तीच्या वेळेत मदतकार्य करण्यासाठी या हेलिकॉप्टरचा उपयोग करता येईल. कारण यामध्ये स्ट्रेचरसह वैद्यकीय उपचारांचे साहित्य यामध्ये तैनात करता येईल.

जर्मनीत जाणारे वैमानिक

  • मुख्य वैमानिक कॅप्टन संजय कर्वे
  • वरिष्ठ वैमानिक कॅप्टन महेंद्र दळवी
  • सहवैमानिक कॅप्टन मोहित शर्मा

जंगलावर लक्ष ठेवण्याचे आव्हान

  • महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. त्यात नक्षलवादविरोधी सी 60 पथकातील 15 जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
  • राज्यात गेल्या काही दिवसांत नक्षलवादी चळवळ अधिक सक्रिय होत असल्याचे दिसून आले आहे. घनदाट जंगलात नक्षलवाद्यांचा माग काढणे कठीण असते. त्यामुळे आकाशातून जंगलावर लक्ष ठेवणे अधिक सोयीचे असते.
  • या पार्श्वभूमीवर नक्षलवादविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी आता 72 कोटी 43 लाख रुपये खर्च करून फ्रेंच बनावटीचे एच 145 हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येत आहे.