
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस गावात 3 वर्षांच्या चिमुकल्यावर आठ ते दहा मोकाट कुत्र्यांच्या घोळक्याने जीवघेणा हल्ला केला. कुत्र्यांनी मुलाच्या शरीराचे चावे घेत त्याला गंभीर जखमी केले. ही घटना चंद्रपूर शहराजवळील घुग्घूस गावात घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच नाव रजा हुसैन इमरान शेख आहे. जखमी मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घुग्घूस शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी घुग्घूस शहर काँग्रेसने नगरपरिषदेकडे केली आहे. मोकाट कुत्र्यांचा बदोबस्त करावा, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. घुग्घूस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, नगरपरिषदेने मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, पीडित मुलांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजुरेड्डी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.