
सामना प्रतिनिधी । मुंबई
पावसाचा आनंद लुटण्यासाठी लोणावळ्याला गेलेल्या बोरिवली येथील शहा कुटुंबाचे घर चोरटय़ांनी साफ केल्याची घटना घडली. चोरांनी बेडरूमच्या खिडकीला असलेल्या काचा काढून घरात घुसखोरी केली आणि कपाटातील साडेसहा लाखांचे दागिने व ४५ लाखांची रोकड असा ५१ लाखांचा ऐवज चोरून नेला.
बोरिवली पूर्वेकडील दौलत नगरातल्या ओयेसेस अपार्टमेंटमध्ये अमित शहा हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहतात. पावसाचा आनंद लुटण्यासाठी ते सहपरिवार लोणावळ्याला गेले होते. शनिवारी सकाळ ते घरी परतले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरटे त्यांच्या बेडरूमच्या खिडकीच्या काचा काढून घरात घुसले. मग कपाटातील ५१ लाखांचा ऐवज तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर घेऊन पोबारा केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






























































