
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने चक्क राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. वाघाने ठिय्या मांडल्याने तब्बल अर्धा तास महामार्गावरील वाहतूक बंद होती. चंद्रपूर-मुल या महामार्गावरील आगडी फायरलाईन येथे “मामा मेल” या प्रसिद्ध वाघाने या भागात दोन बैलांची शिकार केली होती. त्यामुळे त्याचा राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ वावर होता. मामा मेल हा अतिशय धीट वाघ असून वाहने आणि माणसांच्या उपस्थितीची पर्वा न करता मुक्तसंचार करतो. त्यामुळे त्याने दुपारच्या दरम्यान महामार्गावर ठिय्या केल्याने सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प होती. वन विभागाचे कर्मचारी पूर्णवेळ परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. चंद्रपूर-मुल हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 गेल्या काही दिवसात वन्यप्राण्यांच्या सततच्या हालचालीने चर्चेत आलाय.























































