अवनीला गोळय़ा घालणे हा गुन्हाच! चौकशी समितीचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन , नागपूर

अवनी वाघिणीला मारताना नियम पाळले नाहीत. अवनीला गोळय़ा घालणे बेकायदेशीर होते, असा स्पष्ट निष्कर्ष अवनी वाघिणीच्या मृत्यूबाबत राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने नेमलेल्या चौकशी समितीने दिला आहे. समितीने आपल्या अहवालात अवनीला मारणाऱ्या असगर अली खान आणि वन कर्मचारी मुखबीर शेख यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. अवनीला डार्ट मारणे अवैध होते, असे समितीने म्हटले आहे.
13 जणांचा बळी घेणाऱ्या अवनी वाघिणीला पकडणे शक्य होते की मारणे, याबाबतचा वाद तिच्या मृत्यूनंतर निर्माण झाला होता. नियमांना न धरता अवनीला मारणे ही तिची हत्याच आहे, असा आरोप अनेक राजकीय, स्वयंसेवी संघटनांनी केला होता. वन खाते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सर्व स्तरांतून जोरदार टीका झाल्यावर अवनीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने तीन सदस्यीय समिती नेमली.
…म्हणून अवनीला गोळय़ा घालाव्या लागल्या!
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कडू यांनी ‘डार्ट’ (इंजेक्शन) तयार केले होते. तो त्यांच्या उपस्थितीत आणि 24 तासांत मारला जावा, असे सांगितले होते, मात्र अली आणि शेख यांनी हे दोन्ही नियम पाळले नाहीत. डार्ट 24 तासांमध्ये न वापरता 56 तासांनंतर अवनीला मारल्याने ती बेशुद्ध पडली नाही. त्यामुळे तिला अखेर गोळय़ा घालून ठार मारावे लागले, असे समितीने म्हटले आहे.