वाघ-मानव संघर्ष पेटला , दोन महिन्यात अकरा जणांचा बळी

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि मानव संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या दोन महिन्यात वाघाने अकरा लोकांच्या नरडीचा घोट घेतल्याने वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या कमालीची वाढल्याने त्यांना जंगल कमी पडू लागले आहे. त्यामुळे वाघ आता गावाकडे वळू लागले. जंगलालगत असलेल्या गावांना याचा मोठा धोका निर्माण झालाय. लोकांना शेती आणि सरपण आणण्यासाठी जंगलात जाणे अवघड झाले आहे. अशा लोकांना लक्ष्य करणे वाघाला सोपे झाले. त्यामुळेच गेल्या दोन महिन्यात अकरा लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. जिल्ह्यात सुमारे अडीचशेवर वाघ आहेत. यातील पन्नास वाघ ताडोबा प्रकल्पात, तर इतर आरक्षित जंगलात आहेत. अलीकडे तर ताडोबातील वाघही बाहेर पडू लागले आहेत. आपल्या क्षेत्रावर प्रभाव ठेवण्यासाठी शक्तिशाली वाघ कमजोर वाघांना बाहेर काढले. त्यामुळे संरक्षित जंगल आणि गावाजवळच्या सुरक्षित ठिकाणी वाघ आसरा घेऊ लागलेत. यातूनच मानव वाघ संघर्ष वाढू लागलाय. यावर कायमस्वरूपी तोडगा अजूनही निघालेला नाही. लोकांचे प्रबोधन करूनही ते जंगलात प्रवेश करीतच आहेत. दिलेल्या सूचनांचे बऱ्याचदा पालन होत नसल्याने हल्ले वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संताप दिसून येतो. आता राजकीयदृष्ट्याही प्रश्न उपस्थित केला जात आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी वन विभागाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले, तर अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ही यावर सरकारी प्रयत्नांची गरज व्यक्त केली आहे.

सतत घडणाऱ्या या घटनांनी जंगलात असलेली गावे दहशतीत आली आहेत. दुसरीकडे लोकांमध्ये वन विभागाबद्दल संतापही दिसू लागला आहे. वन्यजीवांचे संरक्षण व्हायलाच हवे, हा वनविभागाचा आग्रह. माणसांच्या संरक्षणाचे काय? हा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. वाघाच्या हालचाली वाढल्याने शेतात काम करणारे मजूरही मिळणे कठीण झाले आहे. कापणीचा हंगाम सुरू असला तरी शेतं पडून राहिली आहेत. वाघाच्या दहशतीमुळे मजूर कामावर जाणं टाळत आहेत. मजूर नसल्याने शेतीतील पिके कापणी थांबली आहे. शासनाने काहीतरी ठोस उपाययोजना करावी. अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे वन विभागाकडून गस्त आणि पिंजरे लावण्याचे प्रयत्न सुरू असले तरी भीतीचं सावट अजूनही कायम आहे. नागरिकांनी वन विभागाकडे स्थायी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. वाघांचं संरक्षण महत्त्वाचं असलं तरी माणसाचा जीव वाचवणं हेदेखील तितकंच गरजेचं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा वाढता वावर, ही आता फक्त जंगलातील नव्हे तर गावागावची जिवंत भीती बनली आहे.

वाघाच्या हल्ल्यातील मृतक ( 4 सप्टेंबरपासून आजतागायत)

1) भूमिका पेंदाम, कळमगाव
2) पांडुरंग चचाने, सावली
3) अन्नपूर्णा बिलोरे, सोमनाथ
4) अमोल नन्नावरे
5) प्रमोद राऊत, ब्रम्हपुरी
6) विद्या मसराम, चिमूर
7) प्रशील मानकर
8) भाऊजी पाल, धाबा
9) वासुदेव वटे, नागभीड
10) नीळकंठ भुरे, चिमूर
11) अल्का पेंदोर, धाबा