जखमेकडे दुर्लक्ष नको!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. प्रदीप गाडगे, मधुमेहतज्ज्ञ

गँगरीन उद्भवले तर होणाऱ्या वेदना आणि आजाराची वाढत जाणारी तीव्रता यावर आराम पडावा यासाठी शस्त्रक्रियेने तो अवयव कापून टाकावा लागतो. याला ‘ऍम्प्युटेशन’ असं म्हणतात. हेही टाळता येऊ शकतं. कारण अशा प्रकारच्या आजारांपैकी 80 टक्के आजाराला मधुमेह कारणीभूत असतो. 25 वर्षांहून अधिक काळ मधुमेह आहे त्यांना न्यूरोपथीचा आणि ऍम्प्युटेशनचा धोका अधिक असतो. मधुमेहामुळे कराव्या लागणाऱ्या ‘ऍम्प्युटेशन’साठी डायबेटिक फुट अल्सर हे सर्वाधिक आढळणारे कारण असते. मधुमेहींना डायबेटिक न्यूरोपथीमुळे (मज्जातंतू निकामी होणे) जखमांची आणि पायाला झालेल्या अल्सरची जाणीव होत नाही. हे अल्सर काहीवेळा बरे होत नाहीत.

परिणामी, गंभीर स्वरूपाचा संसर्ग होतो. अनियंत्रित मधुमेहामुळे मज्जातंतूंची कार्यक्षमता कमी होते आणि संवेदनाही कमी होते. ज्या जखमांकडे लक्षही जाणार नाही किंवा वेदनाही होणार नाही, अशा जखमांमुळेही अल्सर, संसर्ग होऊ शकतो. शरीरातील ऊती मृत (गँगरिन) होऊ शकतात. तळपायाला फोड आल्यामुळे त्या व्यक्तीची चाल बदलू शकते.